मराठीचा झेंडा की मतांची गणितं?
‘इंग्रजी’ बॅनरवरून मनसे, ठाकरे गटावर भाजप-शिंदे सेनेचा घणाघात
ठाणे, ता. १२ ः मराठी अस्मितेचे कट्टर रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने ठाण्यात चक्क इंग्रजी भाषेतून प्रचाराचे बॅनर लावल्याने नवा वाद उफाळून आला आहे. यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली असून, सत्तेसाठी भाषा आणि तत्त्वे बदलण्याची सवय या पक्षांना लागली आहे, असा टोला लगावला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अमराठी आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठीच मराठीचा आग्रह धरणाऱ्या पक्षांना इंग्रजीचा आधार घ्यावा लागल्याचे चित्र दिसत आहे. मराठीचा कळवळा केवळ भाषणापुरताच असून, प्रत्यक्षात मतांची गणितं जुळवण्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची या पक्षांची तयारी आहे, असा आरोप महायुतीने केला आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी यावर निशाणा साधताना म्हटले, की नेहमी मराठीचा पुळका दाखवणाऱ्यांना आता इंग्रजीत प्रचार करावा लागतोय. वरळीतील गुजराती बॅनरचा इतिहास अजून ताजा आहे. ही चूक नसून मतदारांच्या सोयीनुसार घेतलेली जाणीवपूर्वक भूमिका आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार टोला हाणत म्हटले, की तत्त्व, विचार आणि भाषा हे सर्व आता फक्त स्टेजपुरतेच मर्यादित राहिले आहेत. गरजेनुसार भूमिका बदलण्यात हे पक्ष माहीर आहेत. टीकेला उत्तर देताना मनसेने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आमचे ९९ टक्के बॅनर हे मराठीतच आहेत, केवळ एखादा बॅनर इंग्रजीत असला म्हणजे आमची भूमिका बदलली असे होत नाही, असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.
अस्मितेचे राजकारण
ठाण्यातील राजकारणात भाषेचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे; मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘मराठी’ विरुद्ध ‘इंग्रजी’ असा हा वाद रंगल्याने मतदारांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावर खळ्ळ-खट्याक करणाऱ्या मनसेला आता इंग्रजी बॅनरचे समर्थन करताना कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.