कुर्ला नेहरूनगरमध्ये तीन शिवसैनिकांमध्ये चुरशीची लढत
शिवसेना शिंदे गटाचा एक, ठाकरेंच्या शिवसेनेचा एक अधिकृत तर दुसरा बंडखोर रिंगणात; मत विभागणी अटळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६९ मध्ये तीन शिवसैनिकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या प्रभागात एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवत असलेले जय कुडाळकर, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर आणि ठाकरे गटाचे विभाग संघटक राहिलेले कमलाकर नाईक यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे तीन हाडाच्या शिवसैनिकांमध्ये होत असलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप- शिवसेना- रिपाइं महायुती, शिवसेना (ठाकरे)- मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युती आणि काँग्रेस- वंचितची आघाडी अशा पद्धतीने एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, कामगारबहुल मतदार असलेल्या प्रभाग क्र. १६९ कुर्ला नेहरूनगरमध्ये मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या तिघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे.
एकाच पक्षाचे कार्यकर्ते फाटाफुटीमुळे वेगवेगळे लढत आहे. त्यांच्याकडून प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आपण चालत आहोत, मराठी माणसासाठी काम करत आहोत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एकाच मुशीत तयार झालेल्या तिघांपैकी कोणाला मतदान करावे, असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीतही काट्याची टक्कर
विधानसभा निवडणुकीत कुर्ला विधानसभेतून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार मंगेश कुडाळकर यांनी निवडणूक लढवली होती. तर त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून प्रवीणा मोरजकर या मैदानात होत्या. तेव्हा कमलाकर नाईक हेही ठाकरे गटातच होते. तेव्हा कुडाळकर आणि मोरजकर यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती. कुडाळकर हे केवळ चार हजार १८७ मतांनी पराभव झाला होता.
विधानसभा निवडणुकीतील मते
मंगेश कुडाळकर - ७२ हजार ७६३
प्रवीणा मोरजकर - ६८ हजार ५७६
२०१७च्या पालिका निवडणुकीतील चित्र
प्रवीणा मोरजकर (शिवसेना) - १०,२९९
श्रीकांत भिसे (भाजप) - ५,५११
सुभाष भालेराव (काँग्रेस) - ४,०४५
प्रशांत बागडे (मनसे) - १,९९९
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.