व्यवस्थेच्या विलंबाचा बळी
केईएममध्ये हिमोफिलिया रुग्णाचा जीवनरक्षक औषधाअभावी मृत्यू
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२: केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका हिमोफिलिया रुग्णाचा मेंदूतील रक्तस्रावादरम्यान वेळेवर क्लॉटिंग फॅक्टरचे इंजेक्शन न मिळाल्याने मृत्यू झाला. जर हे जीवनरक्षक औषध वेळेत दिले गेले असते, तर रुग्णाचे प्राण वाचू शकले असते; मात्र, व्यवस्थेतील विलंबामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप हिमोफिलिया रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने केला आहे. यानिमित्ताने, पालिकेकडे जीवनरक्षक औषधांच्या खरेदीसाठी निधीची कमतरता आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
हिमोफिलिया हा जन्मजात आजार असून, यात रक्त सामान्यपणे गोठत नाही. दुखापत किंवा अंतर्गत रक्तस्राव झाल्यास दीर्घकाळ रक्तस्त्राव सुरू राहतो. अशा वेळी तातडीने क्लॉटिंग फॅक्टर देणे अत्यावश्यक असते; अन्यथा रुग्णाची स्थिती जीवघेणी ठरू शकते. केईएम रुग्णालयात याच फॅक्टरच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हिमोफिलिया अॅडव्होकेसीचे प्रमुख आणि स्वतः या आजारातून वाचलेले जिगर कोटेचा यांनी सांगितले की, ४६ वर्षीय रुग्णाला गेल्या बुधवारी मेंदूतील रक्तस्राव झाल्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही वैद्यकीय आणीबाणीची स्थिती असून, अशा वेळी क्लॉटिंग फॅक्टर तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक असते. रुग्णालयात हा उपलब्ध नव्हता. रुग्णाकडे ईएसआयसी कार्ड होते; मात्र कुटुंबीयांना याची माहिती नव्हती. “मी कुटुंबाला याबाबत माहिती दिली आणि शुक्रवारी फॅक्टरची व्यवस्था करून दिली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता,” असे कोटेचा यांनी सांगितले.
----------
खरेदीचा प्रस्ताव नामंजूर
या प्रकरणात त्यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाताकडेही विनंती केली होती. त्यावेळी अधिष्ठाता यांनी स्पष्ट केले की, इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र तो मंजूर झाला नाही. तसेच डिसेंबरमध्ये केंद्र सरकारकडेही इंजेक्शन पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्या पत्राला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या घटनेनंतर हिमोफिलिया संघटनांनी स्वतंत्र चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, फॅक्टरची आपत्कालीन खरेदी आणि हिमोफिलिया रुग्णांसाठी स्वतंत्र विशेष बजेटची मागणी केली आहे.
----------
निविदा तीन वर्षांपासून अयशस्वी
हे प्रकरण राज्यात हिमोफिलिया फॅक्टरच्या सततच्या कमतरतेकडेही लक्ष वेधते. फॅक्टर-८ साठीची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून अयशस्वी ठरत आहे, तरीही कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रक्ततज्ज्ञांची नियुक्तीही अपुरी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा पालिका यापैकी कोणीही हिमोफिलिया रुग्णांची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे, विशेषतः मुंबईसारख्या शहरात हिमोफिलिया फॅक्टरची इंजेक्शने अत्यंत महाग असून, हजारो रुपयांचा खर्च आणि अनेक डोसची आवश्यकता भासते. त्यामुळे, उपचारांचा खर्च वाढतो आणि रुग्णांचे प्राण धोक्यात येत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.