अण्णामलाई यांच्याविरुद्ध
पाेलिसांत तक्रार दाखल
मालाड, ता. १२ (बातमीदार) : तमिळनाडू राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते के. अण्णामलाई यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात बांगूरनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘मुंबई ही महाराष्ट्राची नाही’ असे वक्तव्य करून त्यांनी मुंबईचा, महाराष्ट्राचा तसेच मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान मालाड येथे झालेल्या सभेत अण्णामलाई यांनी हे वक्तव्य केले. सदर वक्तव्याचा व्हिडिओ ११ जानेवारी २०२६ रोजी यूट्युबवर पाहण्यात आला असून, त्याची लिंकही तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे.
‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’ असा उल्लेख करून मराठी अस्मितेचा व महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेचा अपमान करण्यात आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वकील सुभाष पगारे यांनी तक्रार दाखल केली असून, उच्च न्यायालयाचे वकील सुशींदर कुमार मुत्तुस्वामी यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे. संबंधित वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, अण्णामलाई यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.