पनवेल दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाभंग : जयंत पाटील
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : ‘मुख्यमंत्री पनवेल दौऱ्यावर येऊन गेले असले, तरी या दौऱ्यातून पनवेलकरांच्या पदरी मोठा अपेक्षाभंग पडल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी कळंबोली येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेच्या वेळी बोलताना सोमवारी (ता.१२) दिली.
जयंत पाटील यांनी सांगितले की, ‘नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर होईल तसेच पनवेल महापालिकेच्या घरपट्टीचा प्रश्न सोडवण्याबाबत ठोस घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र मुख्यमंत्री कोणतीही ठोस घोषणा न करता निघून गेल्याने पनवेलकरांचा भ्रमनिरास झाला. सत्ताधाऱ्यांना वाटत आहे की सर्व मते त्यांच्या खिशात आहेत आणि ती पैसे देऊन विकत घेता येतील. या अहंकारातून या निवडणुकीत विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ही बाब पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणारी आहे.’ मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना ‘५०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर ६५ टक्के कर माफ करू, असे कोणीही कागदावर लिहून देऊ शकते’ असा टोला लगावला होता. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘पनवेल महापालिकेत महाविकास आघाडीचे मताधिक्य आले तर नागरिकांना ६५ टक्के घरपट्टी करमाफी दिली जाईल, म्हणूनच ही हमी बॉण्डवर लिहून दिली आहे. आम्ही यापूर्वी ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका चालवल्या आहेत. आम्हालाही कायदा माहिती आहे. जनतेच्या हितासाठी विधिमंडळ अस्तित्वात आहे. जुने कायदे बदलणे आणि नवीन कायदे अमलात आणणे ही प्रक्रिया विधिमंडळ करत असते आणि ती आम्ही याआधीही करून दाखवली आहे,’ असे स्पष्ट करत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाम शब्दांत उत्तर दिले.