मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याची मागणी
मुलुंड, ता. १३ (बातमीदार) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या कार्यक्रमानुसार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर कामगार, कर्मचारी व अधिकारी यांची निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवून हे कर्मचारी सकाळी ५ वाजल्यापासून कार्यरत असतात, तर काही लांब पल्ल्यावरील कर्मचारी मतदानाच्या आदल्या रात्रीच आपापल्या मतदान केंद्रांवर हजर राहतात.
अशा परिस्थितीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवास, भोजन तसेच इतर मूलभूत सुविधांची जबाबदारी निवडणूक प्राधिकरणाची असते. मात्र, अनेकदा या सुविधा वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः महिला कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यरत असल्याने त्यांना पाणी, शौचालय व अन्य आवश्यक सुविधांचा अभाव भासतो, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी सकाळी ५ वाजल्यापासून ते सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कधी कधी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना थांबावे लागते. एवढ्या दीर्घ सेवेनंतरही त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी नियमित दैनंदिन कामकाजासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दि. १६ जानेवारी रोजी निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी आणि कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका प्रशासन व मुख्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या विशेष कर्तव्यास योग्य तो सन्मान व प्रोत्साहन देण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.