वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १३ : पनवेल, नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या रील्सचा समाजमाध्यमांवर धुमाकूळ सुरू आहे. त्यात सर्वाधिक लक्षवेधक ठरत आहेत ते उमेदवारांनी मतदारांसमोर घातलेले लोटांगण, मतदारांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांना दर १० पावलागणिक वाकावे लागत आहे. काही ठिकाणी वाकून व चार ते पाच मजले चढून उमेदवार हैराण झाले आहेत. त्यामुळे कुणाच्या कष्टाला फळ मिळते. मतदारराजा कुणाच्या झोळीत मताचे दान टाकतो, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या बहुतांश प्रभागांत पक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची रेलचेल आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून, प्रत्येक जण एका एका मतासाठी वाट्टेल ते तयार करण्याची तयारी ठेवत आहे. बहतांश उमेदवारांनी बाकी काही असो वा नसो; परंतु आपला समाजमाध्यम विभाग अतिशय सक्रिय ठेवला आहे. रील्स तयार करण्यासाठी खास व्यक्तीची नियुक्ती केली आहे. उमेदवारदेखील ती व्यक्ती आल्याशिवाय घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ शूटिंग करणे, रात्री त्याचे एडिटिंग करणे व उमेदवारांना सूट होतील, अशी गाणी भरून १५ ते ३० सेकंदाच्या रील्स तयार करून रात्रीच विविध समाजमाध्यमावर पोस्ट करत आहेत. पक्षीय उमेदवार, नेत्यांनी प्रभागात फिरल्याच्या, त्यांना मतदारांनी प्रतिसाद दिल्याच्या, नेत्यांच्या भाषणाच्या, प्रचार फेऱ्यांच्या व झेंडा, बॅनरच्या तसेच प्रभागात फिरणाऱ्या प्रचार रथांच्या रिल्स झपाट्याने तयार होऊन पोस्ट केल्या जात आहेत. अपक्षही तोच पॅटर्न वापरत आहेत. रस्त्यावरून कुठे लवाजमा घेऊन, तर कुठे बँड पथकासोबत हात जोडत फिरल्याच्या, मतदारांनी हारतुरे घातल्याच्या, सत्कार केल्याच्या रिल्स समाज माध्यमांवर ट्रेंड झाल्या आहेत.
साष्टांग दंडवत आणि गळाभेट
विविध प्रभागांत उमेदवार दिवस उगवण्याची वाट पाहात आहेत. सूर्य उगवताच भेटीगाठी सुरू करीत असून, वडीलधाऱ्या मतदारांना थेट साष्टांग दंडवत घालून मताचे दान मागत आहे. काही प्रभागात गळाभेटींचा ज्वर चढला असून, मतदानासाठी विनवणी केली जात आहे. दुपारी थोडाफार विसावा घेतला, बाकीच्या टीमचा आढावा घेतला की पुन्हा भेटीगाठीला सुरुवात करीत आहेत. रात्री १० पर्यंत हे भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. एकदा रील व्हायरल झाली व मतदारांनी ती पाहिली असेल, असे गृहीत धरून मतदारांना राग येऊ नये, म्हणून उमेदवार प्रत्येकाच्या पायावर नतमस्तक होत आहेत.
उमेदवारांसाठी रात्र थोडी...
मतदारांच्या भेटीगाठीत दिवसभर वाकून-वाकून थकले, भागलेले उमेदवार जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत पुन्हा प्रभागात कुठे काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. आल्यानंतर दोन ते तीन तास कशीबशी झोप घेऊन पुन्हा सकाळी तयारीस लागत आहे. उमेदवारांना दिवसही पुरत नसून रात्रही थोडीच झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.