रायगड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार; अधिक सवलतींचा लाभ
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यात कर्मचाऱ्यांसाठी विशेष बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार सोमवारी (ता. १२) रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारामुळे रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि सवलतीच्या स्वरूपातील विविध आर्थिक सुविधा मिळणार आहेत.
या कराराअंतर्गत एसबीआयच्या राज्य शासन वेतन खाते योजनेतून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी शून्य शिल्लक पगार खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या खात्यासोबत खातेदारांना मोफत वैयक्तिक अपघात विमा देण्यात येणार असून, विमा संरक्षणाची रक्कम एक कोटी १० लाख रुपयांपासून कमाल दोन कोटी ६० लाख रुपयांपर्यंत असणार आहे. तसेच मोफत हवाई अपघात विम्याचाही लाभ मिळणार आहे. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार ८० लाख रुपयांपर्यंत, तर कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सवलतीच्या दरात ५५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या विम्यामध्ये खातेधारकासह जोडीदार व दोन अपत्यांचा समावेश असेल. ग्राहकांना एसबीआयच्या कोणत्याही एटीएममधून मोफत पैसे काढण्याची सुविधा तसेच कार कर्ज, गृहकर्ज व वैयक्तिक कर्जावर अतिरिक्त सवलती मिळणार आहेत. मासिक पगारानुसार प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर व रोडियम अशी विविध श्रेणीतील सॅलरी खाती उघडण्याची संधी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कौतुक केले.