प्रचाराची सांगता, आता उत्सुकता निकालाची
कल्याण-डोंबिवलीत ‘काटे की टक्कर’
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा धुरळा अखेर शांत झाला असला, तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. महायुती, शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच आघाड्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने काही प्रभागांत विजयाचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. आता सर्वांच्या नजरा येत्या २४ तासांतील घडामोडींकडे आणि १५ जानेवारीच्या मतदानाकडे लागल्या आहेत.
यंदाच्या निवडणुकीत केवळ पक्षनिष्ठा नाही, तर उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा आणि ‘कामगिरी’ याचा कस लागणार आहे. डोंबिवली पॅनेल २९ मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे उमेदवार आमनेसामने आल्याने युतीमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. पाटील बंधू विरुद्ध भाजप अशा या लढतीत राजकीय आणि आर्थिक ताकद पणाला लागली आहे.
कल्याण पश्चिमच्या प्रभाग २ मध्ये शिवसेनेच्या शालिनी वायले यांच्यासमोर भाजप आणि ठाकरे गटाने तगडे आव्हान उभे केले आहे. येथे पाणी आणि रस्ते या प्रश्नांवर महिला मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. डोंबिवली पश्चिमला पॅनेल २५ मध्ये मनसेच्या धात्रक परिवाराने भाजपच्या स्थानिक उमेदवारांसमोर मोठे संकट उभे केले आहे. जुन्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मनसेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. एककीकडे चुरशीच्या लढती असताना, दुसरीकडे महायुतीची संघटनात्मक ताकद काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून आली आहे.
विशेषतः डोंबिवली पश्चिम आणि मध्य भागात मनसेच्या उमेदवारांना तरुण मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे भाजप-शिवसेना महायुतीसमोर सरळ विजय सोपा राहणार नाही, असे संकेत आहेत. डोंबिवली पश्चिमला पॅनेल २५ मध्ये मनसेने धात्रक परिवाराला उमेदवारी दिली आहे. भाजपकडून स्थानिक चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. मात्र, भाजपमध्ये गेली अनेक वर्षे राहिलेले धात्रक आणि त्यांचे प्रभागातील काम यामुळे आताच्या भाजपच्या उमेदवारांना सहज विजय शक्य नाही.
पॅनेल २२ मध्ये शिंदेसेनेकडून विकास म्हात्रे, कविता म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून प्रकाश भोईर यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने येथे संदेश व रसिका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. येथे मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. त्यामुळे प्रकाश भोईर यांना काटे की टक्कर येथे मिळणार आहे. कल्याण पॅनल १७ मध्ये मोरेश्वर भोईर व कुणाल पाटील धनंजय गायकर आणि प्रज्ञेश पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार तगडी लढत देत आहेत. पॅनेल ६ मध्ये शिंदे गटाचे संजय पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर यांच्यात तगडी लढत होणार आहे. एकूणच, कल्याण-डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक महायुतीसाठी सत्तेची चाचणी ठरणार आहे, तर विरोधकांसाठी अस्तित्व टिकवण्याची आणि पुन्हा उभारी घेण्याची संधी आहे.
मनसेचा ‘फॅक्टर’
डोंबिवली मध्य आणि पश्चिम भागात मनसेला तरुणांचा मिळणारा प्रतिसाद प्रस्थापित पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पॅनेल २२ मध्ये प्रकाश भोईर (भाजप) विरुद्ध संदेश पाटील (मनसे) अशी चुरस पाहायला मिळत आहे.
‘धनशक्ती’ विरुद्ध ‘जनशक्ती’
कल्याण पूर्वेतील वरुण पाटील यांच्यासारखे कोट्यधीश उमेदवार चर्चेत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात ‘कामगिरी की पैसा?’ असा प्रचार विरोधकांनी राबवल्याने मतदारांचा कल अनिश्चित आहे. कल्याण पॅनेल १७ मध्ये मोरेश्वर भोईर आणि कुणाल पाटील (ठाकरे गट) यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.