‘सुंदर कोकण’साठी ग्रामस्थ एकवटले
वणव्यांपासून झाडांचे संरक्षण; तीन ग्रामपंचायतींचा आदर्श उपक्रम
माणगाव, ता. १४ (वार्ताहर) : कोकणच्या हिरवाईचे संवर्धन व ‘सुंदर कोकण’ ही ओळख अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मोर्बे-डोंगरोली-साई ग्रामपंचायतींकडून माणगाव-म्हसळा रोडलगत वृक्षसंरक्षण व स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडलेला हा उपक्रम स्थानिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरला.
पूर्वी लावलेली अनेक झाडे तुटली असली, तरी शासनामार्फत नव्याने लावलेली झाडे उत्तम वाढू लागली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात मोर्बे व डोंगरोली परिसरात लागणाऱ्या वणव्यांमुळे ती जळण्याचा धोका असल्याने या तीन ग्रामपंचायती पुढे आल्या. मोर्बेचे सरपंच शौकत रोहेकर यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच राजू मोरे, ग्रामसेवक नरेश तरडे, सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. साईचे उपसरपंच विठोबा मोरे यांच्यासह प्रवीण अधिकारी, रवींद्र अधिकारी, धनाजी येलवे, गफार सोलकर व महिलांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
दानशूर नागरिक अल्ताफ धनसे, अब्दुला महंमद शरीफ हर्णेकर, सैफुल्ला जळगावकर व परिसरातील नागरिकांनी पुढील सांभाळासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडे ही गावाची संपत्ती असल्याचे सांगत त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. व्यापारी अर्जुन भाटी यांनीही मदत करून पर्यावरण एकतेचा संदेश दिला.
सामूहिक श्रमदानाची ताकद
या उपक्रमातून नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून ग्रामीण समाजही तितकाच महत्त्वाचा घटक आहे, हे अधोरेखित केले. “प्रत्येक गावाने फक्त एक तास श्रमदान दिले, तर परिसर सुंदर होईल व पर्यटकांची संख्या वाढेल,” असे आवाहन गफार सोलकर व प्रवीण अधिकारी यांनी केले. ‘सुंदर कोकण’साठी लोकप्रतिनिधी-प्रशासन-ग्रामस्थ यांचे एकत्र येणे हीच खरी जमेची बाजू ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.