डम्पिंगमुळे श्वसनाचा त्रास!
पिंक ट्री फाउंडेशनचा अहवाल; ६० टक्के रहिवासी आजाराचे बळी
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १४ (बातमीदार) ः देवनार येथील कचराभूमी, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे या घातक प्रदूषणाचा गोवंडी, देवनार, शिवाजी नगर परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. तब्बल ६० टक्के रहिवासी श्वसनाच्या आजारांचे बळी पडत असल्याचे पिंक ट्री फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे.
गोवंडीत पालिकेच्या एम पूर्व विभागात भारतातील सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड वसलेले आहे.
या डम्पिंग ग्राउंडमध्ये लाखो टन कचरा टाकण्यात येत होता. सध्या कचरा टाकण्यात येत नसला तरी प्रदूषणाचा फटका रहिवाशांना बसत आहे.
मुंबई शहर व उपनगरातील पालिका व खासगी रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने याच परिसरात २००९ मध्ये एसएमएस कंपनीची स्थापना केली होती.
या एसएमएस कंपनीद्वारे जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते.
त्यातून दिवस-रात्र विषारी धूर हवेत सोडण्यात येतो. या वायुप्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
ही एसएमएस कंपनी मुंबईबाहेर हटवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे, परंतु हे आश्वासन हवेत विरून गेले असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. चार वर्षांपासून या परिसरामध्ये सिमेंट प्लॅन्टच्या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कुपोषित बालके व गरोदर महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला असून, त्यातील कित्येक श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत.
नुकतेच पिंकट्री फाउंडेशन, वातावरण आणि गोवंडी न्यू संगम वेल्फेअर (जीएनएसडब्ल्यू मुंबई) यांच्या वतीने डिसेंबर व जानेवारी महिन्यात परिसरात फुप्फुसांच्या आरोग्याची तपासणी उपक्रम राबविण्यात आला होता.
या शिबिरात एका जलद, एआय-आधारित आवाजाच्या चाचणीद्वारे सुमारे २०० पेक्षा अधिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली, ज्यातून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत.
आंदोलनानंतरही दुर्लक्ष
डम्पिंग ग्राउंड व वायुप्रदूषण करणाऱ्या कंपनीला हटवण्यात यावे, यासाठी कित्येक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी जनआंदोलन केले आहे. याशिवाय पालिका तसेच प्रदूषण मंडळ व राज्य सरकारकडे या प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, आजतागायत कोणीही दखल घेतलेली नाही, असा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.