राज्यभरात १५ हजारांहून अधिक उमेदवार
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; पाेलिसांची करडी नजर
मुंबई, ता. १४ : राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण दाेन हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून तीन कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदारांकरिता ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण १५ हजार ९०८ इतके उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे मतदान बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मिरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महापालिकेसाठी मतदान होत आहे.
मतदान गुरुवारी (ता. १५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधित ठिकाणी १६ जानेवारीला सकाळी १० वाजता सुरुवात होईल. एकूण मतदारांत एक कोटी ८१ लाख ९४ हजार २९२ पुरुष, एक कोटी ६६ लाख ८० हजार ४४९ महिला; तर चार हजार ५९६ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण ३९ हजार ९२ मतदान केंद्रांपैकी एकूण तीन हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.
--
मुंबई वगळता अन्य सर्व २८ महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. मुंबई महापालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागांत साधारणत: चार जागा असतील. काही महापालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार मुंबई वगळता अन्य सर्व महापालिका निवडणुकांत प्रत्येक मतदाराने साधारणत: चार मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी तीन ते पाच मते देणे अपेक्षित असेल. मुंबई महापालिकेचे २२७ प्रभाग असून यांसह सर्व महापालिका मिळून ८९३ प्रभाग आहेत. त्यात एकूण दाेन हजार ८६९ जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण १५ हजार ९०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
--
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था
महापालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. मुंबई महापालिकेसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.
--
पोलिस बंदोबस्त
महापालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात तीन अपर पोलिस अधीक्षक, ६३ पोलिस उपअधीक्षक, ५६ पोलिस निरीक्षक, ८५८ सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक आणि ११ हजार ९३८ पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. ४२ हजार ७०३ होमगार्डदेखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या एकूण ५७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
--
महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपले मत आपल्या शहराचे भवितव्य ठरवू शकते. लोकशाहीतला तो आपला महत्त्वाचा हक्क आहे आणि तो आपण मतदानाच्या माध्यमातून बजवायला हवा. त्यासाठी आपण नक्की मतदान करावे.
- दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.