अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावरील मोरिवली गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येणारा प्रवास अखेर थांबण्याच्या दिशेने आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पादचारी पुलाच्या मागणीला अखेर रेल्वे प्रशासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. पंतप्रधान कार्यालयातूनही या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मोरिवलीतील कामगार वर्गासह स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोरिवली गावात पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा अधिकृत मार्ग नसल्याने नागरिकांना दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. वाहनाने प्रवास करायचा झाल्यास १०० रुपयांचा अतिरिक्त खर्च येत असल्याने तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नव्हता. परिणामी, रोजगार, शिक्षण व उदरनिर्वाहासाठी अनेक नागरिक रेल्वेची संरक्षक भिंत ओलांडून जीवघेणा प्रवास करण्यास भाग पडत होते. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंगत्व घेऊन जगत आहेत. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही सुरक्षित पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना धोक्याचा मार्ग स्वीकारावा लागत होता.
जागेची परिस्थिती व तांत्रिक व्यवहार्यता लक्षात घेऊन योग्य ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रविंद्र वंजारी यांनी स्पष्ट केले. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या निर्णयामुळे मोरिवलीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आंदोलन, सह्यांची मोहीम
या गंभीर पार्श्वभूमीवर मोरिवलीतील नागरिक, कामगार संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पादचारी पुलाच्या मागणीसाठी लढा उभारला. आंदोलन, सह्यांची मोहीम, तसेच प्रशासनाकडे केलेला पत्रव्यवहार यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान संतप्त नागरिकांनी जाब विचारत घेराव घातला. या लोकशक्तीमुळेच प्रशासनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली.
अनेक अडचणी
सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रार आणि पाहणीत संरक्षक भिंतीचा काही भाग खराब झाल्याचे निदर्शनास आले. प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही भिंत तातडीने पुनर्बांधण्यात आली; मात्र भिंत उभारल्याने नागरिकांची गैरसोय आणखी वाढली. भिंत बांधल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले, तर काही कामगारांना एमआयडीसीतील नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आणि पादचारी पुलाच्या मागणीने पुन्हा जोर धरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.