राहायला एका प्रभागात; मतदान दुसऱ्या प्रभागात
पालिका निवडणुकीत मतदाराची मोठी तारांबळ
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये नियमितपणे मतदान केलेल्या एका युवक मतदाराची यंदाच्या पालिका निवडणुकीदरम्यान मोठी तारांबळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३० मध्ये राहणाऱ्या प्रशांत पवार या तरुणाचे नाव यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी संबंधित केंद्राच्या मतदार यादीत आढळून आले नाही.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशांत पवार मतदान केंद्रावर पोहोचले असता यादीत त्यांचे नाव नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत विविध मतदार याद्यांमध्ये नावाची शोधाशोध करण्यात आली. मात्र, संबंधित प्रभागात नाव न सापडल्याने मतदार आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. अखेर सखोल तपासणीअंती प्रशांत पवार यांचे नाव घाटकोपर पश्चिमेतील डोंगर भागात असलेल्या वर्षानगर परिसरातील प्रभाग क्रमांक १२४ च्या मतदार यादीत नोंद असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात राहायला प्रभाग १३० मध्ये असतानाही मतदानासाठी दुसऱ्या प्रभागात नाव नोंदवले गेले असल्याने त्यांना आपल्या हक्काच्या मतदानापासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या प्रशासकीय त्रुटींमुळे नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होत असून, मतदार याद्यांतील चुका तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.