डॉ. सिद्धार्थ कदम यांना ‘बेस्ट पेपर’ पुरस्कार
वाणगाव, ता. १५ (बातमीदार) : कृषी अर्थशास्त्र विभाग, जुनागढ कृषी विद्यापीठ, जुनागढ (गुजरात) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जुनागढ (गुजरात) येथे जय सरदार राष्ट्रीय सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यात देशभरातील विविध कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था व आयसीएआर अंतर्गत कार्यरत शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. शेती, कृषी अर्थशास्त्र, शाश्वत कृषी विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर या परिषदेत सखोल चर्चा झाली. या स्पर्धात्मक व उच्च दर्जाच्या संशोधन सादरीकरणांमध्ये पालघर कृषी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ कदम यांच्या संशोधनात्मक लेखाची निवड होऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘बेस्ट पेपर’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कृषी संशोधन केंद्र, पालघर यांच्या वतीने कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अमोल दहिफळे यांच्या हस्ते डॉ. सिद्धार्थ कदम यांचा सत्कार करण्यात आला.