तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : मतदान केंद्रावर यादीत दुबार नावे आढळल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. अनेक मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर दोनदा नोंदवली गेल्यामुळे प्रत्यक्ष मतदान करताना अडचणी निर्माण झाल्या. काही मतदारांना आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे, हे शोधण्यासाठी वेळखाऊ धावपळ करावी लागली.
दुबार नोंदीमुळे मतदान प्रक्रियेत विलंब झाला असून, मतदान कर्मचाऱ्यांवरही ताण वाढला. काही ठिकाणी मतदारांनी निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अशा चुका टाळण्यासाठी मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक प्रशासनाने संबंधित तक्रारींची दखल घेत तपास सुरू केल्याचे सांगितले असून, पुढील निवडणुकांत अशा त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
दुबार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून अर्ज भरून देत आपला मतदानाचा हक्क बजावला. एकाच ठिकाणी दोन नावे, तर काहींची नावे ही दुसऱ्या प्रभागात असल्याने मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला.
मतदान करण्यासाठी गेलो असता माझे दुबार नाव असल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक आयोगाकडून अर्ज देण्यात आला. त्यानंतर अर्ज भरून दिल्यानंतर मी मतदानाचा हक्क बजावला.
- चेतन पाटील, मतदार, पावणे गाव