मुंबईत शिंदे गटाची सुमार कामगिरी
तब्बल ९० जागा लढवून २६ ठिकाणी विजय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ठाणे, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे शिवसेनेला मुंबईत आपला जम बसवता आला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. या वेळी मुंबई महापालिकेच्या निकालात हे प्रकर्षाने दिसून आले. मुंबईत ९० जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विजयाचा स्ट्राइक रेट राखता आला नाही. ठाकरे गटाच्या गोटातून फोडलेल्या ६२ नगरसेवकांपैकी केवळ २६ उमेदवारांना विजय मिळवता आला; मात्र शिवसेनेला सोबत घेतल्याचा फायदा शिंदेंऐवजी भाजपला जास्त झाल्याचे चित्र आहे.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता; उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने शिवसेनेला ९० जागा सोडल्या. या जागांवरून मुंबईतील मोठा भाऊ आता छोटा भाऊ ठरल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे सर्वात पहिला धोका होता, तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेपुढे; मात्र मुंबई पालिकेच्या निकालात शिंदे यांचा पक्ष अपेक्षित कामगिरी करू शकला नाही; मात्र मराठी मतांमध्ये काहीअंशी फूट पडून त्याचा फायदा भाजपला झाल्याचे चित्रही या निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत जर भाजपने शिवसेनेला सोबत घेतले नसते तर कदाचित भाजपला अपेक्षित यश मिळाले नसते, हेदेखील या निकालातून अधोरेखित झाले आहे.
ठाकरेंची पकड मजबूत
मुंबईत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा अजेंड्यावर आणला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मुंबईत कसा प्रतिसाद मिळणार, हा प्रश्न होता. त्यामुळे शिंदेंनी ठाकरे गटाच्या अनेक नाराजांना गळाला लावले होते. तरीही त्यांना मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याने मुंबईत ठाकरेंचीच पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भविष्यातील वाट बिकट
मुंबई महापालिकेतील सत्ता ठाकरे यांच्या हातून निसटली असली तरी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचे १० आमदार निवडून आले होते, तर शिंदेंचे सहा आमदार होते; मात्र त्यानंतर आता पालिकेतही ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाची सुमार कामगिरी झाली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत त्यांची वाट बिकट असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.