मिरा-भाईंदर महापालिका
़़़़़़़़़़़़़
मतविभागणी व संघटनात्मक ताकदीच्या अभावाचा शिवसेनेला फटका
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत ९५ पैकी ७८ जागा जिंकत भाजपने विक्रमी बहुमत मिळवले आहे. यावरून मिरा-भाईंदर हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भाजपकडे असलेली कार्यकर्त्यांची फौज, मतदानाच्या दिवशीची नियोजनबद्ध आखणी, प्रचारादरम्यान देण्यात आलेला विकासावरचा भर यांच्या जोरावर भाजपने शिवसेनेची धूळधाण उडवत महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
उलटपक्षी शिवसेनेकडे (शिंदे गट) परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा अपवाद वगळता दुसऱ्या फळीत नसलेले दमदार नेतृत्व, शिवसेनेचे बालेकिल्ले वगळता अन्य प्रभागात नसलेली संघटनात्मक ताकद, तसेच ठाकरे गट व मनसेमुळे झालेली मत विभागणी याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. भाजप- शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार नरेंद्र मेहता या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दुसरीकडे काँग्रेसही आहेत त्या जागा राखून आणखी विस्तार करण्याच्या प्रयत्नात होती.
मत विभागणीचादेखील मोठा फटका शिवसेनेला बसला. मिरा गाव, पेणकर पाडा, गोडदेव, नवघर, खारीगाव हा मराठमोळा परिसर. एकत्रित शिवसेनेचे हे बालेकिल्ले; मात्र विभाजनानंतर येथील शिवसेनेची सर्व मते शिंदे गटाकडे वळली नाहीत. परिणामी, ठाकरे गट व मनसे यांनी शिंदे गटाची मते मोठ्या प्रमाणात विभागली. त्याचा परिणाम म्हणून शिवसेनेने २० ते २२ जागा गमावल्या. ही निवडणूक भाजपविरोधात शिवसेना न होता सरनाईक विरुद्ध मेहता अशीच झाली. या वेळी शिवसेनेकडून मेहता यांना लक्ष्य करून टीकेची मोठी झोड उठवली होती; मात्र ही टीका मतदारांनी फारशी गांभीर्याने घेतली नाही, हेच या निकालावरून स्पष्ट झाले.
दुसरीकडे भाजपचे नरेंद्र मेहता यांनी पक्षाकडे असलेल्या संघटनात्मक ताकदीचा पूर्ण वापर करून घेतला. मतदानाच्या दिवशी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करताना दिसले होते. मेहता यांनीदेखील सर्व परिसर पिंजून काढला. प्रत्येक जागा कशी जिंकता येईल, यासाठी आवश्यक ती व्यूहरचना केली. त्याचा फायदा भाजपला झाला. मेहता यांच्यावर होत असलेल्या टीकेकडे भाजपने फारसे लक्ष दिले नाही व आपली मतपेढी सुरक्षित कशी राहील, याची काळजी घेतानाच शिवसेनेचा गड कसा उद्ध्वस्त करता येईल, यावर भर दिला. त्यामुळेच भाजपला विक्रमी बहुमत मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.