पनवेल महापालिका विश्लेषण
---------------------
भाजपच्या विजयी रथापुढे महाविकास आघाडी गारद
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : मालमत्ता कर, रस्त्यांची दुरवस्था आणि पाणीटंचाई असे नागरिकांवर थेट परीणाम करणारे मुद्दे होते. त्याचा योग्य वापर आणि उमेदवार निवडीमध्ये चूक या महत्त्वाच्या बाबींमुळे पुन्हा एकदा शेकाप महाविकास आघाडीला भाजपचा विजयी रथ पनवेलमध्ये थांबवणे जमले नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या व्हिजन २०३० पुढे विरोधकांचे काही फावले नाही.
विशेष म्हणजे शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांची निष्ठा फारशी न टिकल्यामुळे सात जागांवर महाविकास आघाडीला निवडणूक न घेताच पराभवाची नामुष्की ओढावली. तरीसुद्धा कशाप्रकारे भाजप सत्तेचा वापर करून उमेदवारांना माघार घ्यायला लावतो. हा नरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केला खरा, परंतु तोही प्रशांत ठाकूर यांनी हाणून पाडल्यामुळे त्याचा मतांवर काही परिणाम न झाल्याचे निकालाहून दिसले. तळोजा परिसरातील शेकापला मानणारी काही मुस्लिम आणि ग्रामीण भागातील प्रभागांमध्ये शेकापचा निभाव लागल्यामुळे नऊ जागा शेकापला जिंकता आल्या. मात्र, गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत हे यश फारच तुटपुंजे आहे. भाजपने ७८ जागांवर उमेदवार घोषित केल्यानंतरही महाविकास आघाडीच्या वाटाघाटी संपलेल्या नव्हत्या. खारघरची कॉलनी फोरम ही महाविकास आघाडीतर्फे लढणार की नाही हे ठरण्यात काही अवधी गेला. एकेकाळचा मोठा भाऊ असणारा शेकाप यंदाही बड्या भावाच्या भूमिकेत वावरताना दिसला नाही. शेकाप नेत्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा विश्वास संपलेला दिसून येत होता. याउलट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये हा विश्वास अधिक होता. त्यामुळे तळोजा भागात नेत्यांनी आपल्या घरात उमेदवारी ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली नाराजीचा फटका चांगला बसला. खारघरमध्येही भाजपला बंडखोरांची डोकेदुखी होईल, असे चित्र होते, परंतु काही एक पॅनेल सोडता इतर ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवले. भाजपने पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि तक्का या भागात निवडलेले उमेदरावारांनी चोख कामगिरी बजावली, परंतु कामोठे परिसरात भाजपने केलेली उमेदवारांची निवड चुकीची ठरली.
आरपीआय आठवले गटातून दिलेले उमेदवार प्रभाकर कांबळे यांना नवीन पनवेल भागातून लढवायला हवे होते, परंतु कामोठे येथे लढवल्यामुळे त्यांचा अभिमन्यू झाला. कामोठेमध्ये त्यांच्या पराभवासाठी समाजबांधवांनीच जबाबदारी घेतल्याने भाजपच्या उमेदवारांवर परिणाम झाला. या भागात भाजपने उमेदवारांचा ठाकरे गटाच्या उमेदवारांनी पराभव केला. तरीसुद्धा पॅनेलनिहाय उमेदवार आल्यामुळे ७८ जागांपैकी भाजपला ६० जागांवर विजय मिळवता आला, तर महाविकास आघाडीला अवघ्या १८ जागांवर समाधान बाळगावे लागणार आहे. या निवडणुकीत मिळालेल्या यशातून पुन्हा एकदा भाजपला प्रशांत ठाकूर यांनी त्यांची मत्सद्देगिरी आणि निर्णयक्षमता दाखवून दिली आहे, तर या निवडणुकीतही माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाचा अभाव वेळोवेळी जाणवला. पाटील यांच्या प्रती असलेल्या भीतीने कोणीही माघार घेण्याची हिंमत दाखवली नसती, परंतु ही भीती आता शेकापमध्ये उरली नसल्याने काही उमेदवारांनी स्वतःच्या मिळालेल्या निष्ठेच्या योग्य तो फायदा घेऊन टाकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.