बंडखोरीचा फुगा फुटला
- प्रचारात आघाडी, निकालात पिछाडी
- बंडखोरांना मतदारांचा नकार; मुंबईत केवळ मतविभाजनापुरतीच भूमिका
नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकीत प्रचाराच्या काळात गाजलेली बंडखोरी निकालाच्या दिवशी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. विविध पक्षांतून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले बहुतांश बंडखोर उमेदवार मतदारांनी साफ नाकारले. अनेक प्रभागांमध्ये त्यांची भूमिका केवळ मतविभाजनापुरतीच मर्यादित राहिली, तर निर्णायक ठरण्याचे दावे निकालात फोल ठरले.
उबाठा शिवसेना, भाजप तसेच इतर पक्षांतील नाराज इच्छुकांनी वैयक्तिक प्रभाव आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर लढत बिघडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष मतदानात मात्र मतदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवरच विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले.
....प्रभागांत अपयश
प्रभाग क्रमांक १६९मध्ये बंडखोरीचा स्पष्ट पराभव दिसून आला. उबाठा शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढलेल्या कमलाकर नाईक यांना २,७७४ मते मिळाली, तर ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रविणा मोरजकर यांनी ८,०२१ मते घेत विजय मिळवला.
प्रभाग १७७मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार कल्पेशा कोठारी यांनी १२,१७९ मते मिळवत बाजी मारली. येथे अपक्ष बंडखोर नेहल शहा यांना ९,२०८ मते मिळाली. मतांची संख्या लक्षणीय असली तरी निकाल पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूनेच गेला.
दक्षिण मुंबईतील चित्र
दक्षिण मुंबईतील प्रभाग १९३मध्ये अपक्ष सूर्यकांत कोळी यांना ६,३५९ मते मिळाली; मात्र उबाठा शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांनी १२,७६८ मते घेत विजय मिळवला.
प्रभाग १९६मध्ये अपक्ष संगीता विकास जगताप यांना अवघी १७१ मते मिळाली.
प्रभाग १९७मध्ये अपक्ष श्रावणी देसाई यांना ३,२१९ मते मिळाली, तर शिंदे शिवसेनेच्या वनिता नरवणकर यांनी ७,१५३ मते घेत बाजी मारली.
मतविभाजनापुरती भूमिका -
प्रभाग २०३मध्ये अपक्ष दिव्या दीपक बडवे यांना ४८२ मते, तर प्रभाग २०५मध्ये अपक्ष जान्हवी जगदीश राणे यांना १,३३९ मते मिळाली. एकूणच या निवडणुकीत बंडखोर अपक्ष मोठ्या संख्येने रिंगणात उतरले असले, तरी बहुतांश ठिकाणी ते निकाल बदलू शकले नाहीत. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि संघटनात्मक ताकदीला मतदारांनी कौल दिल्याने मुंबईत बंडखोरीचा प्रयोग या वेळी स्पष्टपणे अपयशी ठरला.
ग्राफिक्स -
कुठे, किती मते मिळाली?
(बंडखोर अपक्षांची स्थिती)
प्रभाग १६९
कमलाकर नाईक (अपक्ष) - २,७७४
प्रवीणा मोरजकर (उबाठा) - ८,०२१ (विजयी)
-------------
प्रभाग १७७
नेहल शहा (अपक्ष) - ९,२०८
कल्पेशा कोठारी (भाजप) - १२,१७९ (विजयी)
--------------
प्रभाग १९३
सूर्यकांत कोळी (अपक्ष) - ६,३५९
हेमांगी वरळीकर (उबाठा) - १२,७६८ (विजयी)
-------------
प्रभाग १९७
श्रावणी देसाई (अपक्ष) - ३,२१९
वनिता नरवणकर (शिंदे सेना) - ७,१५३ (विजयी)
---------
बंडखोरांचा काय परिणाम?
१. अनेक प्रभागांत बंडखोरांनी मते कापली, पण निकाल बदलू शकले नाहीत.
२. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवर मतदारांचा विश्वास कायम राहिला.
३. बंडखोरीमुळे काही ठिकाणी लढत चुरशीची झाली, मात्र विजय पक्षाचाच ठरला.
४. वैयक्तिक प्रभावापेक्षा संघटनात्मक ताकद प्रभावी ठरली.
५. मुंबईत बंडखोरीचा प्रयोग निवडणूक निकालात अपयशी ठरला.