ठाकरे बंधूंच्या रूपात सक्षम विरोधक
विरोधकांमधील बेबनाव सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून काढून घेत सत्तेच्या चाव्या या वेळी भाजपकडे आल्या. दुसरीकडे मात्र ठाकरे बंधूच्या रूपात मुंबईकरांनी महापालिकेला सशक्त विरोधी पक्षही दिला आहे. या निकालाने ठाकरेंच्या सत्तेची शेवटची गढीही त्यांच्या हातातून गेली आहे; मात्र मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा कायम आहे. एकट्या मराठीच्या मुद्यावर मुंबई पालिकेत सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही, हेदेखील या निकालाचा मोठा अन्वयार्थ आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका सुरुवातीपासून विशेष रंगल्या नाहीत. शिवाजी पार्कमधील ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेमुळे शेवटच्या दोन दिवसांत पालिकेच्या प्रचारात रंगत आली. मराठी माणूस जागा झाला नाही, तर ही शेवटची निवडणूक असेल, अशी भावनिक साद राज ठाकरे यांनी घातली; परंतु मुंबईकरांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही.
----
शिवसेना ठाकरे गट
पक्ष फुटला, विधानसभेत दारुण पराभव, पालिकेतील ६२ नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंची सोबत धरली. राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे काँग्रेससोबतची युती तुटली, तरी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत मिळून भाजपसमोर सशक्त पर्याय उभा केला. ठाकरे बंधूंनी सार्वजनिक सभा घेण्याऐवजी २२७ शाखांच्या भेटींना जाऊन मरगळलेल्या संघटनेला कामाला लावले. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था एकहाती जिंकणाऱ्या भाजपला या वेळी केवळ चार जागा अधिक जिंकता आल्या.
---
मनसे
१९ वर्षांतील सर्व मतभेद विसरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली. शिवाजी पार्कच्या सभेत अदाणींच्या उद्योगविस्ताराचा लेखाजोखा मांडला. मराठी माणसाला अस्तित्वाची जाणीव करून दिली; मात्र राज ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ५१ जागा लढवून केवळ सहा जागा जिंकता आल्या. मनसेपेक्षा एमआयएमला जास्त जागा मिळाल्या. मनसेच्या निराशाजनक कामगिरीमुळे शिवसेनेला पालिकेत मॅजिक फिगर गाठता आली नाही.
----
काँग्रेस
अंतर्गत मतभेद, कमजोर पक्षबांधणी आणि ठाकरेंशी तुटलेल्या आघाडीमुळे काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली. काँग्रेसने या वेळी वंचित बहुजन आघाडीसोबतची हातमिळवणी केली; मात्र प्रत्यक्ष मैदानात त्यांची आघाडी फारशी प्रभावी ठरली नाही. मुंबईला अनेक महापौर देणाऱ्या काँग्रेसचे पालिकेतील संख्याबळ ३१ वरून २४ वर घसरले आहे. पक्षाचा मुस्लिम आणि दलित जनाधारही घटला. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळे उद्धव ठाकरे यांचे पालिकेतील सत्तेचे समीकरणही बिघडले.
---
निकालातील मोठे मुद्दे
- मराठी मतांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव कायम
- केवळ मराठीच्या मुद्यावरून पालिका जिंकता येत नाही
- काँग्रेसला सोबत घेतले असते तर ठाकरेंना अधिक यश मिळवता आले असते
- विकासाच्या मुद्यालाही मुंबईकरांची पसंती
- हिंदी भाषिक, गुजराती मतांवर भाजप स्वार
- मुंबईतील मुस्लिम मतदारांवर एमआयएमची छाप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.