उत्तर भारतीयांचा कौल भाजपला
नालासोपाऱ्यातील मतदारांनी बविआला नाकारले
विरार, ता. १७ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेत यापूर्वी एक जागा मिळवणाऱ्या भाजपने ४३ जागा जिंकत मुसंडी मारली आहे. या विजयात नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांनी कमळ हातात घेतल्याने बहुजन विकास आघाडीला फटका बसला आहे.
वसई-विरार शहरात तिसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११३, भाजपने ९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडी, भाजपमधून झालेले पक्षांतर, आरोप-प्रत्यारोप, बड्या राजकीय नेत्यांच्या झालेल्या सभा तसेच मतदानादिवशी झालेले वाद अशा विविध कारणांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तर मतमोजणीच्या दिवशीही भाजप, बहुजन विकास आघाडीला पडलेल्या मतांमध्ये कमालीचा चढउतार दिसून आला. निकालाअंती बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकत वसई-विरारमध्ये वसई-विरार महापालिकेत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली; पण शहरात बहुजन विकास आघाडीच्या विजयासह भाजपने निवडून आणलेल्या जागांची चर्चा रंगली आहे. २००९ला पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१५ मध्ये १०६ नगरसेवक निवडून आणत बहुजन विकास आघाडी दुसऱ्यांदा महापालिकेत सत्तेत आली. तर २०१५च्या निवडणुकीत एक नगरसेवक निवडून आणत भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. त्यानंतर १० वर्षांनी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत ४३ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे वसई-विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीसाठी कट्टर विरोधक म्हणून भाजपने कडवे आव्हाने उभे केले आहे.
------------------------------------------
पक्ष बांधणीची गरज
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतांच्या जोरावर भाजपने बहुमत मिळवत बहुजन विकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली होती. तर महापालिका निवडणुकीतही काही प्रमाणात तसाच कल दिसून आला. नालासोपारा मतदारसंघातील जवळपास १७ प्रभागांत भाजपसाठी निर्णायक ठरला आहे. भाजपच्या ४३ जागांपैकी तब्बल ३६ जागा नालासोपारा मतदारसंघातील असल्याने बविआला पक्षबांधणी करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.