तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सोनवी अविनाश लाड यांनी इतिहास घडवला आहे. अवघ्या २२व्या वयात निवडून येत त्या नवी मुंबई पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतील सर्वात लहान वयाच्या नगरसेविका ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या विजयात लाड कुटुंबाने दुहेरी यश मिळवले आहे. सोनवी यांच्यासोबतच त्यांच्या आई व माजी नगरसेविका प्रणाली लाड यांनीही विजय संपादन केला आहे. एकाच कुटुंबातील आई-लेकीच्या या यशामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सोनवी या माजी उपमहापौर अविनाश लाड यांची कन्या असून, राजकारणाचा वारसा लाभल्याने अत्यंत कमी वयात जनतेचा विश्वास संपादन केला. प्रचारादरम्यान त्यांनी घरोघरी भेटी देत थेट संवाद साधला. तरुण मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आणि महिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. त्याचा फायदा त्यांना मतपेटीतून मिळाल्याचे स्पष्ट झाले. विकासकामांचा लेखाजोखा, स्थानिक प्रश्नांवरील पकड आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे त्यांना हा विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.