वाशी, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेवरील प्रशासक राजवटीचा अखेर साडेपाच वर्षांनंतर अंत झाला असून शहराला आता लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे नेतृत्व लाभले आहे. पालिका निवडणुकीत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पालिकेवर सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ चाललेली प्रशासक व्यवस्था संपुष्टात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका सुमारे साडेदहा वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यानंतर निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते; मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाची महामारी उद्भवल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेवर प्रशासक राजवट लागू करण्यात आली. या काळात पालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालवण्यात आला. सुरुवातीला अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर अभिजित बांगर आणि पुढे डॉ. कैलास शिंदे यांनी प्रशासकपदावरून पालिकेचा कारभार पाहिला. साडेपाच वर्षे पालिकेवर प्रशासक राजवट कायम होती. या कालावधीत कोरोना, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आदी अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रशासकांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आले; मात्र लोकप्रतिनिधी नसल्याने शहराच्या विकासात लोकसहभाग आणि थेट लोकशाहीचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये सातत्याने व्यक्त होत होती.
अखेर बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुका पार पडल्या आणि त्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत नवी मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन केली. भाजपने सत्ता मिळवल्याने शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे.
नागरी प्रश्नांना गती मिळण्याची शक्यता
लोकनिर्वाचित सभागृह अस्तित्वात येणार असल्याने आता शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, तसेच नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साडेपाच वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर नवी मुंबईत पुन्हा लोकशाहीची घडी बसली असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.