सुजित गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १११ पैकी ६५ जागांवर दणदणीत विजय मिळवून वनमंत्री गणेश नाईक यांनी सत्ता कायम ठेवली आहे. पहिल्यांदा एकहाती सत्ता आणण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महिला आणि पुरुष नगरसेवकांमध्ये अनेक पर्याय भाजपमध्ये असून, आरक्षणाच्या सोडतीवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्थापना १९९२मध्ये झाली. त्यानंतर १९९४मध्ये पहिली निवडणूक झाली. त्या वेळी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली, तेव्हा संजीव नाईक हे पहिले तरुण महापौर झाले. तेव्हापासून आजपर्यंत सलग सहा वेळा महापालिकेवर नाईकांनी ठरवलेलाच महापौर राहिलेला आहे. आताही गणेश नाईक महापौर ठरवणार आहेत, परंतु त्याला राज्यघटनेने बहाल केलेल्या आरक्षणाचे वलय असणार आहे. आतापर्यंत महापालिकेत विविध आरक्षणे पडली आहेत. परंतु महापालिका निवडणूक होऊनसुद्धा निवडणूक आयोगाने महापौरपदाचे आरक्षण न टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या आरक्षणानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये महपौरपदाचा उमेदवार ठरणार आहे. हे पद महापालिकेतील सत्तेवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे हे महापौरपद बाहेर जाण्यापेक्षा आपल्या मर्जीतील अथवा घरातील नगरसेवक देण्याची गणेश नाईकांकडून अधिक शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत १४ महापौर विराजमान
नवी मुंबई महापालिकेची १९९४ला पहिल्यांदा निवडणूक झाली. दरवर्षी आरक्षण बदलत असल्याने त्या कार्यकाळात पाच महापौर झाले. १९९९मध्ये तीन महापौर, तर महापालिकेच्या तिसऱ्या निवडणुकीत अडीच वर्षांच्या अंतराने दोन, तर चौथ्या टर्ममध्ये दोन आणि पाचव्या टर्ममध्ये दोन महापौर झाले. असे आतापर्यंत एकूण १४ महापौर झाले आहेत.
आरक्षणाचे समीकरण
२०१५मध्ये महापालिकेचे अनुसूचित जाती आरक्षण होते. २०१८मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी पुरुष होते. आताचे निवडणूक पॅनेल पद्धतीने पहिल्यांदा झाल्याने पहिले आरक्षण गृहीत धरले, तर सर्व आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकाव्या लागतील आणि जर २०१५पूर्वीच्या निवडणुकांची समीकरणे गृहीत धरली, तर यातून मागासवर्गीय आरक्षणाची चिठ्ठी बाहेर काढली जाईल, अशी शक्यता आहे. मग कदाचित खुल्या प्रवर्गातील महिला व पुरुष किंवा अनुसूचित जमाती लागू शकतो. त्यानुसार प्रभाग क्रमांक ६ मधील वर्षा रमेश डोळे यांना संधी आहे.
महापौरपदासाठी या नावांची चर्चा
महिला नगरसेविकांमध्ये चार वेळा नगरसेविका झालेल्या नेत्रा शिर्के यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्यानंतर शुभांगी पाटील, भारती पाटील, अंजनी भोईर, सलुजा सुतार यांची नावे घेतली जात आहेत. पुरुषांमध्ये महापौरपदासाठी सागर नाईक, जे. डी. सुतार, डॉ. जयाजी नाथ, सुधाकर सोनवणे, दशरथ भगत, अशोक पाटील (तिसरी टर्म), शशिकांत भोईर, रामचंद्र घरत (तिसरा टर्म), सूरज पाटील, रवींद्र इथापे यांना संधी मिळू शकते.
सर्वात ज्येष्ठ नगरसेवक
महापालिकेच्या आतापर्यंत सहावेळच्या निवडणुकीत सलग पाच वेळा निवडणूक लढवून विजय मिळणारे तीन नगरसेवक आहेत. माजी महापौर सुधाकर सोनवणे, जयंवत सुतार आणि डॉ. जयाजी नाथ हे पाच वेळा नगरसेवकपदी जिंकून आले आहेत.
सर्वात तरुण चेहरा
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात तरुण नगरसेवक चेहरा म्हणून माजी उपमहापौर अविनाश लाड यांची कन्या सोनवी या आहेत. शिवसेनेच्या दीक्षा कचरे, अदिती नाईक याही सर्वात तरुण नगरसेविका असणार आहेत.
सभागृहात ५० नवीन चेहरे
अरुणा शिंदे, चांदणी चौगुले, श्वेता काळे, गौरी आंग्रे, शुभम चौगुले, राजू कांबळे, वैशाली पाटील, पूजा पाटील, ऐश्वर्या सोनावणे, शिवाजी खोपडे, रेश्मा मढवी, श्रेया जिरगे, वर्षा डोळे, गंगा पाटील, चैताली पाटील, अनिकेत म्हात्रे, गणेश सकपाळ, माधुरी हरिजन, ललिता मढवी, अंजना म्हात्रे, वैशाली म्हस्कर, सौरभ शिंदे, संदीप म्हात्रे, चंद्रभागा मोरे, राजू मढवी, मीनाक्षी पाटील, शिरीष पाटील, ज्ञानदेव पाटील, अदिती नाईक, वैष्णवी नाईक, प्रतीक्षा पाटील, सविता सांगळे, भरत भोईर, कविता पाटील, सोनवी लाड, प्रीती भगत, निशांत भगत, गणपत भाकर, शैला पाटील, शिल्पा ठाकूर, सुनील कुरकुटे, सविता लगाडे, अबोली कुलकर्णी, प्रणाली पाटील, शशिकला औटी, अभिजित देसाई, प्रीती भोपी, सचिन लवाटे, संतोषी म्हात्रे, विशाल विचारे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.