महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा परिषद निवडणूक लढवणार
रायगड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्धार
मुरूड, ता. १९ (बातमीदार) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रायगड जिल्ह्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात मनसेकडून स्वतंत्र उमेदवार उभा करून त्यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या विशेष बैठकीत एकमताने घेण्यात आला.
या निर्णयाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याबाबत सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद दाखवत मनसेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. अलिबाग-मुरूड मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात सक्षम, जनसंपर्क असलेले आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले उमेदवार उभे करण्यावर भर देण्यात येणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत, जिल्हा सचिव अक्षय महाले, अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धनाथ म्हात्रे, मुरूड तालुका सचिव राजेश तरे, सिद्धेश घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये मनसेची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.