नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : एमआयडीसी पाण्याचे देयक अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका नामांकित कंपनीच्या फायनान्स मॅनेजरचा फोन एपीके फाइलद्वारे हॅक करून त्याच्या कंपनीच्या खात्यातून तब्बल २७ लाख ७० हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
कामोठे सेक्टर २१ मध्ये तक्रारदार राहण्यास असून, ते एका खासगी कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या बँकेतील सर्व व्यवहाराचे ओटीपी त्यांच्या मोबाईलवर येत असतात. ८ जानेवारीला त्यांच्या व्हॉट्सॲपवर सायबर चोरट्याने एमआयडीसी वॉटर बिल अपडेट या नावाने एपीके फाइल पाठवली. तसेच व्हाॅट्सॲपवर विश्वास बसावा, यासाठी त्याच्या प्रोफाइल फोटोवर एमआयडीसीचा लोगो लावण्यात आला होता. त्यानंतर चोरट्याने एमआयडीसी पाणीपुरवठा कार्यालयामधून बोलत असल्याचे सांगून, या मॅनेजरला संपर्क साधला. तसेच त्यांना पाठवण्यात आलेली फाईल ओपन करून कंपनीचे नाव व ग्राहक क्रमांक अपडेट करण्यास सांगितले. अन्यथा पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशी धमकी दिली.
सायबर चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यवस्थापकाने संबंधित फाइल उघडताच त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून दोन लाख ४० हजार रुपये वजा होण्याचा ओटीपी आला. व्यवस्थापकाला याबाबत संशय येताच त्यांनी सहकाऱ्यांना माहिती दिली, तोपर्यंत दुसऱ्या मोबाईलवरून एकामागोमाग एक असे १४ व्यवहारांचे एसएमएस आले. तसेच त्यांच्या कंपनीच्या एका बँक खात्यातून २६ लाखांची रक्कम, तसेच वाशी शाखेतील चालू खात्यातून एक लाख ७० हजार काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईल हॅक करून त्यांच्या कंपनीच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे लक्षात येताच व्यवस्थापकाने तत्काळ मोबाईल बंद करून बँकेत धाव घेत खाते बंद केले. तसेच सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.