‘लाल वादळ’ धडकणार
पालघरकडे लाँग मार्च मार्गस्थ, १२ ते १५ हजार आंदोलक सहभागी
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १९ ः जल, जंगल, जमिनींसह विविध मूलभूत प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा लाँग मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी चारोटीहून १२ ते १५ हजार मोर्चेकऱ्यांसह निघालेले ‘लाल वादळ’ पालघरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाका येथून दुपारी २ च्या सुमारास हा मोर्चा निघाला, पण सकाळी १० वाजल्यापासूनच चारोटी नाका परिसरात मोर्चेकऱ्यांची गर्दी वाढू लागली होती. संभाव्य कायदा-सुव्यवस्था व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध जिल्ह्यातील पोलिसांची पथके आंदोलनस्थळी होती. या वेळी कासा येथून गुजरातकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला गर्दीतून शिस्तबद्धपणे मार्ग करून देण्यात आला. यामुळे मोर्चेकऱ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखल्याचे चित्र दिसून आले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------
संघर्षासाठी जय्यत तयारी
ः- चारोटीहून निघालेला लाँग मार्च ३० किलोमीटरचा प्रवास करत मनोर मार्गे मासवण येथे सायंकाळी पोहोचणार आहे. रात्री मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी मनोर ते पालघर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंतिम धडक देण्यात येणार आहे.
- तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला, तरुण लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी स्वतःची शिदोरी सोबत ठेवून हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आले.
- पालघर जिल्ह्याला ‘चौथी मुंबई’ म्हणून जाहीर केले जाते; मात्र मुंबईची जशी अवस्था झाली, तशीच येथील लोकांचीही फरपट होणार आहे. विरार-बदलापूरसारखी ढकलाढकली येथेही सुरू आहे. सरकारचा डोळा येथील जमीन, बागा, नैसर्गिक संपत्तीवर असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
-------------------------------
महिलाशक्ती आक्रमक
चारोटी येथील ९० वर्षीय कमळीबाई यांचा सहभाग लक्षवेधक राहिला. त्यांनी यापूर्वी नाशिक ते मुंबई २०० किलोमीटरच्या लाँग मार्चमध्ये सहभाग घेतला होता. यंदाही त्या पायी पालघरपर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहिणी पारधी यांनी निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली गेली; मात्र महिलांवरील अत्याचार अजूनही कमी झालेले नाहीत, अशी भावना व्यक्त केली.
-----------------------------
अनेक प्रकल्प येऊनही बेरोजगारी, वनपट्टे, रेशन, मनरेगा, जलजीवनसारख्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. चौथी मुंबई, विमानतळाची स्वप्ने दाखवली जातात; पण एसटी वेळेवर नाही, शेतीला पाणी नाही, वीजबिले वाढलेली आहेत. वाढवण बंदरामुळे मच्छीमार देशोधडीला लागतील.
- अशोक ढवळे, राष्ट्रीय नेते
-----------------------
पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही रेशन कार्ड, वनपट्टे, वीजबिले, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. वाढवण बंदर, मोरबे बंदर, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरण, जनजीवनाची हानी होत आहे. या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला.
- विनोद निकोले, आमदार
---------------------------
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, योजना बंद पडल्या आहेत. विकासाच्या नावाखाली फक्त घोषणा केल्या जात आहेत. आजचा हा लाल वादळ सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवेल.
- अजित नवले, शेतकरी नेते