तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालातून मतदारांनी ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवणाऱ्यांना मतदारांनी ‘घरी बसवले’, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला असून, विशेषतः पक्षांतर करणाऱ्यांना पराभवाचा फटका बसला आहे. काही प्रभागांमध्ये तर एकाच कुटुंबातील दोन ते तीन उमेदवार रिंगणात होते, मात्र मतदारांनी एकालाही निवडून न देता नाराजीचा ठाम संदेश दिला आहे. कोपरी गावातील मूळ काँग्रेसचे नेते विलास भोईर हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर त्यांच्या पत्नी उषा या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. वेगवेगळ्या पक्षांशी संबंध असूनही दोघांनाही मतदारांचा कौल मिळाला नाही. कार्यकर्ते आणि मतदारांमधील नाराजीचा थेट फटका या दाम्पत्याला बसल्याची चर्चा परिसरात आहे.
नेरूळमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. नामदेव भगत आणि त्यांच्या पत्नी इंदुमती या पती-पत्नी जोडीला महापालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. भगत हे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते असून, त्यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. सिडकोचे संचालकपदही त्यांनी भूषवले होते. कालांतराने त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि तेथे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. महापालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेच्या चिन्हाखाली निवडणूक लढवली; मात्र वारंवार पक्ष बदलल्याचा राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला आणि दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यांची मुलगी पूनम पाटील या निवडून आल्या.
या निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी ‘पक्ष बदलून संधी साधणाऱ्यांना’ स्पष्ट संदेश दिला आहे. निष्ठा, सातत्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान याकडे दुर्लक्ष केल्यास मतदार शिक्षा करतात, हेच या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राजकीय पक्षांसाठीही हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरत आहे.
एकाच घरातील तिघांचा पराभव
सानपाडा प्रभागातही मतदारांचा रोष स्पष्टपणे दिसून आला. या भागात सुरुवातीपासूनच शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित वास्कर कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. या वेळी सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या पत्नी कोमल यांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली. याशिवाय त्यांच्या भावजयही उमेदवार होत्या. एकाच घरातून तीन तिकिटे दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. या नाराजीचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला असून, मतदारांनी या तिघांपैकी कोणालाही निवडून दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.