पडघा, ता. २० (बातमीदार) : गोदाम पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या; तसेच संमिश्र लोकवस्ती असलेल्या भिवंडी तालुक्यातील डोहोळे गट ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘गावाच्या सर्वांगीण विकासासाठी’ या संकल्पनेतून विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रविवारी (ता. १८) पार पडलेल्या या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांची उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. विकासकामांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी ग्रामविकासाच्या प्रक्रियेत स्थानिक लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन केले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आणि तारपा नृत्याच्या सादरीकरणाने झाली. वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात उपस्थित मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. लोकसंस्कृती आणि प्रशासन यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी नलिनी ठोंबरे, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुमन वाघे, उपसरपंच सचिन घोडविंदे, ग्रामपंचायत सदस्य, लिपिक एकनाथ जाधव, काळुराम घोडविंदे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
विविध विकासकामांचे उद्घाटन
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. बगीचा बोर्ड, घरकुल गृहप्रवेश, ऑक्सिजन पार्क, आय लव्ह डोहोळे, रुग्णवाहिका सेवा, पाणी एटीएम यांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वॉल पेंटिंग उपक्रम आणि जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून शिक्षणाच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यात आली.
महिलांचे आर्थिक सबलीकरण
कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयं-सहायता बचतगटांनी उभारलेले विविध स्टॉल्स विशेष आकर्षण ठरले. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचे उत्तम उदाहरण या स्टॉल्समधून दिसून आले. याशिवाय डोहोळेपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली, तर चिंबीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘महिला सुरक्षा - काळाची गरज’ या विषयावर सादर केलेल्या पथनाट्यातून सामाजिक जाणीव जागृत केली.
पडघा : डोहोळे ग्रामपंचायतीतील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कलाकारांनी नागरिकांशी संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.