अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर परिसरात नगर परिषदेच्या डिजिटल मराठी शाळा क्रमांक ९ (सेमी इंग्लिश)च्या नव्या इमारतीत सोमवारी (ता. १९) शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश केला. सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हा या शाळेच्या उभारणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक श्रीराम जोशी यांनी यावेळी केले. नव्या सुविधांमुळे पटसंख्या वाढवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही शाळा यापूर्वी प्राचीन शिवमंदिर परिसरात भरत होती; मात्र जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून शिवगंगानगर येथे नगर परिषदेच्या वतीने नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. इमारतीचे काम पूर्ण होताच शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी नव्या इमारतीत सोमवारी पहिले पाऊल ठेवले. सुमारे नऊ कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेली ही तीन मजली इमारत डिजिटल शिक्षण पद्धतीसह सेमी इंग्लिश अभ्यासक्रमासाठी सुसज्ज आहे. सरस्वती पूजनाने शाळेची सुरुवात होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकनेते अजय जाधव यांच्या पाठपुराव्याने; तसेच माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या विशेष सहकार्याने हा शैक्षणिक प्रकल्प साकार झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी आरपीआय (आठवले गट)च्या अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष रोशनी युनूस शेख, केंद्रप्रमुख व शाळा व्यवस्थापक राठोड, आजी-माजी शिक्षक, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी ही शाळा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
शाळेची रूपरेषा
शाळा इमारतीत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, सभागृह, वाचनालय, प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या, डिजिटल फळे (बोर्ड), कर्मचारी खोली, तसेच आधुनिक आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण आठ वर्गखोल्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिशुमंदिर वर्गही येथे भरविला जातो. शाळेची एकूण पटसंख्या ३०० विद्यार्थ्यांची आहे. शाळेत ११ जणांचा कर्मचारीवर्ग कार्यरत असून, त्यामध्ये पालिकेच्या वतीने नियुक्त शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त अशी आकर्षक भित्तीचित्रेही वर्गखोल्यांच्या भिंतींवर रेखाटण्यात आली आहेत.
पाणीपुरवठा, सुरक्षा रक्षकाचा प्रश्न प्रलंबित
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी शाळेला अद्याप अंबरनाथ नगर पालिकेकडून नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच सुरक्षा रक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्तीही झाली नसल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. या संदर्भात नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.
पालिकेचे स्पष्टीकरण
लवकरच शाळेत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, तसेच सुरक्षा रक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या इमारतीचे रंगकाम तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील नवी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी राजेश तडवी यांनी दिली.
अंबरनाथ : पालिकेची शाळा क्र. ९ इमारतीत शैक्षणिक धडे सुरू करण्यात आले आहे.
अंबरनाथ : शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.