शक्तिस्थळ राखण्याचे शेकापसमोर मोठे आव्हान!
पक्षफुटीचा जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीवर परिणाम; भाजपला संधी
वसंत जाधव / सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २० (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) वर्चस्व राहिले आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षातील फूट, नेतृत्वाचा अभाव आणि कार्यकर्त्यांची गळती यामुळे शेकापसमोर आपले पारंपरिक शक्तिस्थळ टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तालुक्यात आघाडी उघडत सत्तास्थापनेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
एकेकाळी रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर शेकापचा मोठा प्रभाव होता. पनवेल, अलिबाग, उरण, खालापूर, मुरूड आदी तालुक्यांमध्ये पक्षाची मजबूत पकड होती. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत शेकापची सत्ता आणि प्रभाव दिसून येत असे. २०१७ च्या निवडणुकीत पनवेलमधून सहा सदस्य निवडून देत शेकापने अलिबागमधील नेतृत्वाला बळ दिले होते. दुसरीकडे, भाजपने पनवेल तालुक्यात सातत्याने आपला जनाधार वाढवला आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले असले, तरी पंचायत समितीमध्ये भाजपने चांगली मुसंडी मारली होती. काही गणांमध्ये अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या सात वर्षांत मात्र राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. शेकापला सर्वाधिक धक्का बसला तो पक्षातील फूट आणि नेतृत्व संकटामुळे. माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी कारागृहात असल्याने पक्षाचे नेतृत्व कमकुवत झाले आहे. माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी पनवेल तालुक्यातील १६ पंचायत समिती व आठ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजपकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, आरक्षणामुळे अनेक दिग्गज इच्छुकांमध्ये अस्वस्थतादेखील आहे.
................
चौकट : चिन्ह नसल्याने शेकापसमोर आणखी अडचण
शेतकरी कामगार पक्षाचे ‘खटारा’ हे पारंपरिक चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चित चिन्ह मिळणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावरच उमेदवारांना निवडणूक लढवावी लागणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे आणि ओळख निर्माण करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.