पर्यावरणपूरक माघी गणेशोत्सवासाठी पालिकेचे प्रयत्न
विसर्जनासाठी कृत्रिम तलावांसह विविध सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : माघी श्रीगणेशोत्सव उद्यापासून (ता. २२) सुरू होत असून, हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ‘तात्पुरता मंडप उभारणी’ परवानगीकरिता ऑफलाइन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून, मंडप परवानगीसाठी केवळ १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली माघी गणेशोत्सवाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित व सुरळीत व्हावे, यासाठी पालिकेकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नद्या, समुद्र, तलाव अथवा अन्य नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार आणि २६ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकानुसार ६ फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात येणार आहे.
प्रदूषण टाळण्याचे आवाहन
रंगीत रसायने, थर्माकोल, प्लॅस्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य आदी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळे व भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक गरजेनुसार कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात येणार आहे.
गणेशभक्तांनी श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करावे. उच्च न्यायालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- प्रशांत सपकाळे
उपआयुक्त तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.