उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक निकालाने शहराच्या राजकारणात इतिहास रचला आहे. ७८ सदस्यीय सभागृहात यावेळी महिलांनी बाजी मारली असून, तब्बल ४५ महिला उमेदवारांनी विजय मिळवत पुरुषप्रधान राजकारणाची चौकट मोडून काढली. तुलनेत फक्त ३३ पुरुष उमेदवारांना यश मिळाले. मतपेटीतून उमटलेला हा कौल केवळ सत्ता बदलाचा नसून, महिला नेतृत्वावर मतदारांनी टाकलेला ठाम विश्वास असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करतो.
निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली आणि मतदारांनीही त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आरक्षणापुरते मर्यादित न राहता, अनेक प्रभागांत खुल्या जागांवरही महिलांनी दणदणीत विजय मिळवला. घराघरांत पोहोचून केलेला प्रचार, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची स्पष्ट भूमिका या साऱ्याचा थेट फायदा महिलांना झाला. विशेष म्हणजे, या निकालामुळे महापालिका सभागृहातील निर्णयप्रक्रियेत मोठा बदल अपेक्षित आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालसुरक्षा, तसेच नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर अधिक संवेदनशील, लोकाभिमुख आणि परिणामकारक निर्णय घेतले जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राजकीय अभ्यासकांच्या मते, हा निकाल उल्हासनगरपुरताच मर्यादित न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांतील बदलत्या राजकारणाचे द्योतक आहे. महिला केवळ प्रतिनिधी नाहीत, तर निर्णायक नेतृत्व आहेत, हा संदेश या निवडणुकीतून ठळकपणे समोर आला आहे. महिलाप्रधान सभागृह आगामी काळात विकास, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अधिक ठोस पावले टाकेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.