करसुडची सेंद्रिय परसबाग ठरतेय प्रेरणादायी
विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील भोपोली केंद्रांतर्गत करसुड येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेले सेंद्रिय परसबाग उपक्रम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शाळेच्या परिसरात हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध व आदर्श पद्धतीने राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या परसबागेतून मिळणाऱ्या ताज्या व सेंद्रिय भाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पोषण आहारात करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकस, ताजे व आरोग्यदायी अन्न मिळत असून, त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून येत आहे. त्याचबरोबर शेतीविषयक पायाभूत ज्ञान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन तसेच स्वावलंबनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना परसबाग निर्मितीचे तंत्रज्ञान, पीक लागवड, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर यासह विज्ञान, पर्यावरण, गणित व सामाजिक शास्त्र यासारख्या विषयांशी निगडित प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान प्राप्त होत आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः या बागेची देखभाल करत असल्याने त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा, जबाबदारीची भावना व संघभावना विकसित होत आहे. जिल्हा परिषद शाळा करसुड येथे राबविण्यात येत असलेला सेंद्रिय परसबाग उपक्रम हा शैक्षणिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत स्तुत्य असून, इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण व आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले.
--------------------
चौकट
विविध फळबागांची लागवड
परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढत असून, प्रत्यक्ष लागवड, संगोपन व उत्पादन प्रक्रियेचा अनुभव त्यांना मिळत आहे. शाळेच्या मोकळ्या जागेत सेंद्रिय पद्धतीने परसबाग विकसित करण्यात आली असून, या बागेत कोबी, टोमॅटो, वांगी, दोडका, कारली, ब्रोकोली, पालक, मेथी, कोथिंबीर, काकडी, मिरची, भोपळा, झेंडू आदी विविध फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.