भाजपच्या अपेक्षांना ब्रेक
एसटी आरक्षणात शिंदे सेनेचा वरचष्मा
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता थांबली आहे. महापालिकेत महापौर पदासाठी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने सत्ता समीकरणाला नवे वळण मिळाले आहे. या आरक्षणामुळे भाजपच्या अपेक्षांना ब्रेक लागला असून, महापौर पदावर शिंदे सेनेचा वरचष्मा असणार हे दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान महायुतीत एकत्र लढलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजपात निकालानंतरही युती कायम राहणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. महापौरपदावरून दोन्ही पक्षांत सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत गाठता आले नव्हते. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. या भेटीनंतर कल्याण-डोंबिवलीतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले.
शिंदे सेना आणि मनसे एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. तेवढ्यात खासदार डॉ. शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला मनसेचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट केले आणि या चर्चांवर पडदा टाकला. यातूनच त्यांनी युती असली तरी महापालिकेत ‘मोठा भाऊ’ म्हणून शिवसेनाच कायम राहील आणि शिवसेनेचाच महापौर बसेल, असा सूचक इशारा भाजपाला दिला होता. या घडामोडींमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गुरुवारी महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होताच भाजपच्या उरल्या-सुरल्या अपेक्षांनाही पूर्णविराम मिळाला आहे. याचे कारण म्हणजे भाजपाकडे अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक नाही, तर शिंदे गटाकडे दोन नगरसेवक असून, शिंदे गटाचा महापौर बसेल आणि भाजपला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आरक्षणाचे गणित
पॅनेल ३ ‘ब’मधून हर्षाली थवील यांनी मनसेच्या ज्योती आभाळे यांचा पराभव केला. पॅनेल ५‘ब’मधून किरण भांगले यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या डॉ. धनंजय खोचडे यांचा पराभव केला. तर पॅनेल १५ ‘ब’मधून मनसेच्या शीतल मंढारी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या तारामती बांगर यांचा पराभव केला. त्यामुळे एसटी प्रवर्गातून शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. महापौरपदासाठी एसटी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिंदे सेनेत आनंदाचे वातावरण असून, भाजपाच्या गोटात निराशा पसरली आहे. भाजपकडे एसटी प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने त्यांना आता उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.