फादर हिलरी फर्नांडिस यांच्यावर अंत्यसंस्कार
विरार, ता. २३ (बातमीदार) ः ख्रिस्ती धर्माचे भारतीयीकरण करण्यात मोलाचे योगदान असलेले प्रख्यात वसईकर ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धापकाळाने निधन झाले होते. शुक्रवारी वसईच्या रमेदी चर्च येथे तीन बिशपांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता फादर फर्नांडिस यांच्यासाठी विशेष प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ११ वाजता फादर हिलरी यांनी, स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांच्या पार्थिवाचे ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन न करता पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत दहन करण्यात आले. फादर हिलरी यांच्या पश्चात ज्येष्ठ बंधू रॉबर्ट फर्नांडिस, पुतण्या फादर कॅलिस्टस फर्नांडिस व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
शुक्रवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत फादर हिलरी यांचे पार्थिव वसई पश्चिमेच्या त्यांच्या तरखड येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पार्थिव रमेदी चर्च येथे आणण्यात आले. मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, काश्मीरचे वसईकर बिशप आयवन परेरा, फादर जोएल डिकुना व फादर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष प्रार्थनासभा या वेळी घेण्यात आली. फादर हिलरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, नगरसेवक लॉरेल डायस, जनआंदोलन समितीच्या नेत्या डॉमनिका डाबरे, कॅथोलिक सभेचे अध्यक्ष थॉमस नुनीस आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ११ वाजता मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले.
प्रभू येशूप्रमाणेच फादर हिलरी यांचासुद्धा पुनरुत्थानावर विश्वास होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रभू येशूला समर्पित केले होते. भारतीयीकरणाचा आग्रह धरणारे ते सच्चे ख्रिस्ती धर्मगुरू होते.
- फादर कॅलिस्टस फर्नांडिस (फादर हिलरी यांचे पुतणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.