शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी मुंबईसह संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनानिमित्त दादर येथील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. रिगल सिनेमा येथील शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केले. या वेळी विविध नेत्यांकडून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि त्यांच्या विचारांची स्मृती या सोहळ्याच्या निमित्ताने जागृत झाली. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी या वेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी फुलांची आरास केली होती. आज दिवसभरात बाळासाहेबांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. मुंबई शहरात बाळासाहेबांना अभिवादन करणारे फलक शिवसेनेच्या दोन्ही पक्षांतर्फे लावण्यात आले होते. जन्मशताब्दी वर्षानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले.
राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट
राज ठाकरे यांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त केलेल्या एका पोस्टमध्ये बाळासाहेबांच्या अफाट प्रभावाचा उल्लेख केला आहे. ‘इतिहासात जन्मशताब्दी अनेकांची साजरी होते; पण एखादी व्यक्ती हयात नसतानाही तिने प्रांताच्या राजकारणाला आकार देत राहणे हे दुर्मिळ आहे. बाळासाहेब १०० वर्षांनीच काय; पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील,’ असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे म्हटले, की ‘आज निष्ठा आणि तत्त्वे सहज विकली जातात. राजकारण पूर्ण व्यवहारी झाले आहे. निवडणुकीतल्या क्लृप्त्यांवर यश मोजले जाते. बाळासाहेबांच्या काळात अशा अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना सत्तेचे अप्रूप नव्हते; पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेवर बसवण्याचे समाधान त्यांना होते. बाळासाहेबांचे स्मरण करणारा मराठी माणूस हा खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आणि माणसासाठी जो लढा उभारला, तो धगधगत ठेवण्याची जबाबदारी पुढच्या पिढ्यांची असेल,’ असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे यांचे अभिवादन
शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. ‘तुमचा आशीर्वाद हीच माझी ताकद आणि ऊर्जा! २०२६-२७ हे जन्मशताब्दी वर्ष आम्हां शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही वैचारिक ऊर्जा देणारे ठरेल,’ असे ट्वीट करून त्यांनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.