स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य प्रकल्पाचा प्रभाव
दुर्गम भागात आरोग्य जागृती, तपासणीसह डिजिटल लॉकेटमुळे उपचार सुलभ
संदीप साळवे, सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २४ : पालघर जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण तसेच आदिम कातकरी व आदिवासी वस्त्यांमध्ये आरोग्य विषयाची जाणीव वाढविणारा केशव सृष्टी सामाजिक संस्थेचा ‘स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य प्रकल्प’ गेल्या तीन वर्षांपासून हजारो कुटुंबांसाठी अक्षरशः जीवनसंजीवनी ठरत आहे. २०२२ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सहा केंद्रांमार्फत आतापर्यंत २० हजारांहून अधिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, आजार प्रतिबंधक मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सजगता मिळाली आहे.
आदिम जमातींमध्ये आरोग्यसेवांचा अभाव, अंधश्रद्धा, अपुरी माहिती आणि वेळेवर उपचार न मिळणे ही मोठी आव्हाने असताना, प्रशिक्षित स्थानिक दाम्पत्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारी आरोग्य माहिती या प्रकल्पाने प्रभावीपणे दिली आहे. नियमित घरभेटी, प्राथमिक तपासणी, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि आजार ओळख यामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडू लागले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातून स्थानिक विवाहित दाम्पत्यांची निवड करण्यात आली असून, सध्या ५० दाम्पत्ये कार्यरत आहेत. प्रत्येक दाम्पत्याला दरमहा दोन हजार रुपये मानधन दिले जाते. त्यांना आरोग्य, स्वच्छता, सर्वेक्षण, प्राथमिक तपासणी आणि जनजागृतीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही दाम्पत्ये गावागावात घरभेटी देत कुटुंबांची आरोग्यस्थिती, स्वच्छतेच्या सवयी आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेत आहेत. घराघरात शौचालय, बंदिस्त न्हाणीघर, स्वयंपाकासाठी गॅसचा वापर, स्वयंपाकघरातील हवा व प्रकाशासाठी खिडकी आहे की नाही, यासारख्या बाबी तपासून त्याचा सविस्तर नकाशा तयार केला जात आहे. तसेच संस्थेमार्फत दिलेल्या स्वास्थ्य किटच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते.
....................
क्यूआर कोड लॉकेट-डिजिटल आरोग्य क्रांती
या प्रकल्पाची सर्वात अभिनव बाब म्हणजे क्यूआर कोड लॉकेट संकल्पना. प्रत्येक कुटुंबाची आरोग्यविषयक सविस्तर माहिती क्यूआर कोडमध्ये संग्रहित करून कुटुंबप्रमुखाकडे लॉकेट स्वरूपात दिली जाते. रुग्ण शासकीय रुग्णालयात गेल्यास डॉक्टर क्यूआर कोड स्कॅन करून आवश्यक पासवर्डद्वारे संपूर्ण आरोग्य माहिती तात्काळ पाहू शकतात. त्यामुळे वेळेवर, अचूक आणि योग्य उपचार शक्य होत आहेत.
...............
आकडेवारीतून बदल स्पष्ट
सुविधा २०२२ २०२६
शौचालय १,६०० १,७००
बंदिस्त न्हाणीघर १,५०० १,६५०
स्वयंपाक गॅस १,६०० १,७००
स्वयंपाकगृह खिडकी १,६०० १,८००
आतापर्यंत १६ हजार आदिवासी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यात तीन हजार घरे, ७, ५०० पुरुष, ७, ००० महिला, १, ००० किशोरवयीन मुली आणि १, १०० मुलांचा समावेश आहे. तपासणीत ३०० मधुमेह, १,००० रक्तक्षय (ॲनिमिया) आणि ३०० रक्तदाब रुग्ण आढळून त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्यात आले.
...................
सहा केंद्रांमधून प्रभावी अंमलबजावणी
वाडा, मोखाडा, जव्हार, कासा, परळी आणि विक्रमगड या सहा केंद्रांमधून हा प्रकल्प राबविला जात आहे. अत्यावश्यक रुग्णांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय, डहाणू येथील वेदान्त रुग्णालय आणि नाशिकमधील गुरुजी रुग्णालयात संदर्भ सेवा दिली जाते. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना केवळ उपचार नव्हे, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रकल्प संकल्पक डॉ. सुरेश सरवडेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.