प्रजासत्ताक दिनानिमित्त खादीच्या राष्ट्रध्वजाला मागणी
लालबागमधील बाजारपेठेमध्ये खरेदीचा उत्साह
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध आकारांचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या मोहिमांमुळे पॉलिस्टर कापडाऐवजी अस्सल हाताने विणलेल्या खादी राष्ट्रध्वजांकडे नागरिकांसह शासकीय संस्थांचा कल दिसत आहे. लालबागमधील बाजारामध्ये खादीचे राष्ट्रध्वज घेण्यासाठी शनिवारी गर्दी झाली होती.
२६ जानेवारी १९५०ला भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ध्वजवंदन केले जाते. तसेच नागरिक आपले घर, वाहने आणि कपड्यांवर राष्ट्रध्वज लावतात. त्यामुळे या काळात राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मागील काळात राष्ट्रध्वजांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र काही ठिकाणी पुरेशी आवक न झाल्याने दुकानदारांमध्ये निराशेचे वातावरण होते. यंदा मात्र देशभरात खादीच्या राष्ट्रध्वजाला विशेष मागणी असून, मुंबईतील बाजारात त्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. खादी राष्ट्रध्वजाची मागणी जास्त असली तरी त्यावरील किंमत व नफा तुलनेने कमी असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
तिरंगी वस्तूंना मागणी
बाजारात विविध आकारांचे पॉलिस्टर, रेशीम व खादीचे राष्ट्रध्वज, तिरंगी मफलर, लहान मुलांचे ड्रेस, फेटे, ओढण्या, साड्या, शाल, फ्रॉक, टी-शर्ट तसेच प्लास्टिक, मेटल बॅच, बँड आणि रिबन उपलब्ध झाले आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांकडून या वस्तूंना मागणी आहे.
पॉलिस्टर राष्ट्रध्वजाचे दर कमी असले तरी आम्ही खादी राष्ट्रध्वजच खरेदी करून आमच्या इमारतीत फडकवतो आणि मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करतो.
- अहमद मालिम, ग्राहक
भारतीय नागरिकांचे राष्ट्रध्वजावरील प्रेम आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी पॉलिस्टरप्रमाणेच खादी राष्ट्रध्वजांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते.
- सागर पारेख, विक्रेते लालबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.