मिरा-भाईंदरमधील भाजपचा बंडखोर पुन्हा ''स्वगृही''
भाईंदर, ता. २४ (बातमीदार): मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देणारे एकमेव विजयी अपक्ष उमेदवार अनिल भोसले अखेर स्वगृही परतले आहेत. त्यांनी अधिकृतपणे भाजपला पाठिंबा दिला असून, कोकण विभागीय आयुक्तांकडे तशी नोंदणीही केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेत भाजपचे संख्याबळ आता ७९ झाले आहे.
निवडणुकीत भाजपने २२ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती, त्यात अनिल भोसले यांचा समावेश होता. २०१७ मध्येही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, मात्र तेव्हा त्यांची वर्णी ''स्वीकृत नगरसेवक'' म्हणून लावण्यात आली होती. यावेळी प्रभाग १४ मधून तिकीट न मिळाल्याने भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार मीरादेवी यादव यांचा पराभव करत विजय मिळवला. प्रचारादरम्यान पक्षाचे नाव वापरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. निवडणुकीनंतर भोसले यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
मूळचा भाजपचाच
"मी मूळचा भाजपचाच कार्यकर्ता आहे. प्रभागातील लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी मी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे," अशी प्रतिक्रिया अनिल भोसले यांनी यावेळी दिली. भाजपने महापालिकेतील आपल्या गटनेतेपदाची जबाबदारी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता भाजप महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.