वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर दरवर्षी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. याच अनुषंगाने भिवंडीतील ऑल सेट्स हायस्कूलमध्ये बुधवारी (ता. २१) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धांचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच मैदानी खेळांनाही विद्यार्थ्यांनी समान महत्त्व देण्याचे आवाहन केले.
स्पर्धांमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा मशाल प्रज्वलनाने झाली. पाच तालुक्यांतील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना देत स्पर्धांना सुरुवात केली. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर शिस्त, संघभावना, चिकाटी व नेतृत्वगुण विकसित होतात. निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी लहान वयातच खेळाची सवय लागणे अत्यावश्यक असल्याचे यादव यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या ‘दिशा’ उपक्रमाच्या पुढील टप्पा म्हणून ‘मिशन भरारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे व शैक्षणिक संस्थांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धांची जबाबदारी विस्तार अधिकारी शिक्षण आशीष झुंजारराव यांनी पार पाडली. स्पर्धेदरम्यान मनीषा गामणे व रवींद्र तरे यांनी सूत्रसंचलन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये केंद्र पातळीवर प्रथम आलेले संघ तालुका पातळीवर, तर तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविलेले संघ जिल्हा पातळीवरील स्पर्धांसाठी पात्र ठरले होते. स्पर्धा सांघिक व वैयक्तिक प्रकारात तसेच मुले व मुली स्वतंत्र गटांमध्ये घेण्यात आल्या. सांघिक स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, लंग, लेझीम या खेळांचा समावेश होता, तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये ५० मीटर व १०० मीटर धावणे, २५×४ रिले, लांब उडी तसेच संगीत खुर्ची या स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वज्रेश्वरी : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.