उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : महापालिकेच्या दारात रांगा, फाईलींचा खच आणि तक्रारींची वाट पाहण्याची वेळ आता इतिहासजमा होणार आहे. उल्हासनगर महापालिकेने डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या पुढाकाराने यूएमसी कनेक्ट या अधिकृत मोबाइल ॲपला सुरुवात केली आहे. यामुळे महापालिकेच्या सर्व प्रमुख सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
राज्य सरकारच्या डिजिटल इंडिया व स्मार्ट सिटी धोरणाशी सुसंगत पाऊल टाकत उल्हासनगर महापालिकेने प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने यूएमसी कनेक्ट या आधुनिक मोबाइल ॲपची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता व पाणी कर भरणे, विविध प्रकारच्या तक्रारी नोंदविणे व त्यांच्या स्थितीची ऑनलाइन माहिती, परवाने व प्रमाणपत्रांबाबत तपशील, आरोग्य व स्वच्छता सेवा; तसेच महापालिकेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देणे आणि प्रशासन अधिक उत्तरदायी बनविणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे, अशी ठाम भूमिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
संपूर्ण सेवा एका क्लिकवर
ॲपद्वारे कर भरण्याच्या सूचना वेळेवर मिळतात आणि केलेल्या भरणाचे ट्रॅकिंग सहज करता येते. तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. संदर्भ आयडीच्या माध्यमातून तक्रारींची सद्यस्थिती घरबसल्या तपासता येते. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही.
संवाद, पारदर्शकता मजबूत
ॲपमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सशक्त होणार आहे. सेवा पुरवठ्यात पारदर्शकता वाढून कामकाजात गती आणि कार्यक्षमता येणार आहे. नागरिकांचा वेळ व श्रम वाचवत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महापालिकेच्या दैनंदिन कारभारात सुनिश्चित केला जाणार आहे.
नागरिकांना आवाहन
यूएमसी कनेक्ट ॲप गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. शहरातील नागरिकांनी हे ॲप डाउनलोड करून विविध डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशासनात पारदर्शकता, वेग आणि उत्तरदायित्व आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यूएमसी कनेक्ट हा केवळ ॲप नसून नागरिक आणि प्रशासनातील विश्वासाचा डिजिटल सेतू आहे. नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात, त्यांच्या तक्रारींवर वेळेत कारवाई व्हावी आणि महापालिकेचे कामकाज अधिक खुले व उत्तरदायी व्हावे, यासाठी ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उल्हासनगरला खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने उल्हासनगरने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे आहे. या ॲपमुळे नागरिकांना पालिकेच्या सेवा थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी बनेल. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवणारे हे ॲप आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवून उल्हासनगरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम या उपक्रमातून होईल.
- कुमार आयलानी, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.