एमएमआरडीएकडून
म्हाडाला हवेत ३२ कोटी
पैसे देण्यासाठी कोकण मंडळाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : एमएमआरडीएकडून उभारल्या जाणाऱ्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मालकीचा सुमारे ६,१९८ चौरस मीटरचा भूखंड द्यावा लागला. त्या मोबदल्यात तब्बल ३२ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणी म्हाडाच्या कोकण मंडळाने केली आहे. दरम्यान, यापूर्वीच्या पत्राला एमएमआरडीएने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे म्हाडाने पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. यावर एमएमआरडीए काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे शहरालगतच्या मानपाडा चितळसर येथे म्हाडाचा सुमारे ५३ हजार चौरस मीटरचा भूखंड आहे. खासगी विकसकाच्या माध्यमातून म्हाडाने येथे शेअरिंग बेसिसवर घरे बांधली आहेत; मात्र या भूखंडातील सहा हजार चौरस मीटरची जागा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि रस्त्यासाठी गेला आहे. त्यामुळे विकसकाला मिळणारा भूखंड कमी झाल्याने त्याने देय असलेल्या एकूण घरांपैकी १२३ घरे कमी करून केवळ १,०५० घरे म्हाडाच्या ताब्यात दिली आहेत. त्यामुळे म्हाडाला कोट्यवधीचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला ३२ कोटी रुपये देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती; मात्र त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने स्मरणपत्र पाठवले आहे. दरम्यान, पैसे न दिल्यास पर्यायी भूखंड मिळावा, असे म्हाडा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.