वाहतूक पोलिसाला मारहाण
कल्याणमधील घटना; समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : शहरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगितल्यामुळे एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले. शहरातील वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस प्रशासन आणि नागरिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दुर्गाडी चौक येथे वाहतूक पोलिस कर्मचारी विलास भागीत हे कर्तव्य बजावत होते. रात्री १०च्या सुमारास जेव्हा चौकात वाहनांची मोठी कोंडी झाली तेव्हा विलास भागीत यांनी एका कारला वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येताना पाहिले. त्यांनी कार थांबवून चालकाला विचारणा केली. विरुद्ध दिशेने गाडी आणण्याचे कारण विचारले, तेव्हा कारमधील व्यक्तींनी पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केली. तसेच कारमधील चार तरुणांनी विलास भागीत यांच्यावर हल्ला केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तरुणांनी पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर गोंधळ वाढल्याचे पाहून चारही तरुण पसार झाले. जखमी पोलिसाला तातडीने कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हल्ला करणारे शिवसेना (शिंदे गट) समर्थक असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.