हरवलेल्या गतिमंद ‘मोहम्मद’चा पालकांशी समाजमाध्यमांमुळे पुनर्मिलाप
महिन्याभरानंतर स्वगृही परतला; ठाणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ठाणे, ता. २५ | सकाळ वृत्तसेवा हरवलेल्या १७ वर्षीय गतिमंद बालक ‘मोहम्मद’चा पालकांशी पुनर्मिलाप घडवून आणण्यात समाजमाध्यमे निर्णायक दुवा ठरली आहेत. समाजमाध्यमांवरील एका पोस्टमुळे तब्बल महिन्याभरानंतर हा बालक ठाणे शहर पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे आपल्या कुटुंबात परतला. ‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत ठाणे पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
१९ डिसेंबर २०२५ रोजी सुमारे १७ वर्षांचा हा मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे एकटाच आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला मुंबईतील माटुंगा येथील बालगृहात दाखल करण्यात आले. दरम्यान, ठाणे शहर पोलिस दलातील चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे (सीपीयू) पोलिस हवालदार तानाजी गायकवाड यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी त्या बालगृहाला भेट दिली. त्यावेळी मोहम्मद हा गतिमंद असून नीट बोलू शकत नसल्याची माहिती समोर आली. बालकाकडून मिळालेल्या अल्प माहितीनुसार वडिलांचे नाव आलमगीर, नमाजची ओळख अशी प्राथमिक माहिती घेऊन सीपीयू पथकाने मुंब्रा परिसरात शोधमोहीम सुरू केली. मुंब्रा व शिळ-डायघर पोलिस ठाण्यांत चौकशी केली असता, कोणतीही हरवल्याची तक्रार नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक मशिदी, धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शाळांचे व्हॉट्सॲप गट आणि समाजमाध्यमे यांच्या माध्यमातून बालकाचा फोटो व माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली. या प्रयत्नांना यश येत २३ जानेवारी २०२६ रोजी समाजमाध्यमांद्वारे बालकाची आई मोहीबोनीसा यांच्यापर्यंत माहिती पोहोचली. त्यांनी सीपीयू कार्यालयाशी संपर्क साधत आवश्यक कागदपत्रांद्वारे मुलाची ओळख पटवून दिली. व्हिडिओ कॉलद्वारे मोहम्मदनेही आपल्या आईला ओळखले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मायलेकांची भेट घडून आली आणि मोहम्मद अखेर स्वगृही परतला, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे (शोध–२) यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीयू पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.