पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण
पालघर, ता. २७ (बातमीदार) : जिल्हा प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पालघर जिल्हा लवकरच राज्यातच, नव्हे तर देशातही प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिनी कोळगावच्या पोलिस परेड मैदानात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या शासकीय सोहळ्याला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, वरिष्ठ अधिकारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत पालघर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सव्वा लाख कुटुंबांना १३४ कोटी रुपयांची मजुरी देत स्थलांतर रोखणे, महिलांचे स्वावलंबन वाढवणे आणि ग्रामीण अर्थचक्राला गती देणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन नाईक यांनी या वेळी केले. पालघरची ओळख असलेल्या जीआय टॅग मानांकित ‘बहाडोली जांभळा’च्या मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक एकात्मिक प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत चालणाऱ्या या प्रकल्पातून गोठवलेला जांभूळ गर, बी-पावडर आणि आरोग्यदायी सिरका तयार होणार असून, ‘महाब्रँड’, ‘वनधन केंद्र’ आणि ई-कॉमर्सद्वारे थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी संपुष्टात येत, नफा थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचेल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
----------------------------
चौकट
शेतकऱ्यांसाठी विविध योजना
तसेच महत्त्वाकांक्षी बांबू लागवड योजनेत आतापर्यंत १० लाखांहून अधिक रोपांची लागवड झाली असून, पुढील तीन वर्षांत एक कोटी बांबू निर्मितीमधून ५० कोटी रुपयांचे उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळणार आहे. ‘जलतारा’ या प्रभावी जलसंधारण उपक्रमामुळे मातीची धूप रोखली जात असून, एकावेळी साडेतीन लाख लिटर पाणीसाठा होतो. जिल्ह्यात ३ लाख जलतारे प्रस्तावित आहेत. मनरेगा- सी.एस.आर. अभिसरणातून २०० शेततळ्यांची कामे सुरू असून, मोखाड्यातील पोशेरा येथे ३४ शेततळे पूर्ण झाली आहेत. राज्यातील १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत पालघर जिल्ह्यासाठी ५० लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ४५ लाख वृक्षलागवड पूर्ण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.