हवेचा स्तर सुधारणार कधी?
आठवडाभरापासून गुणवत्ता निर्देशांक १२०वर; उपाययोजनांची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २७ : मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आठवडाभरापासून मध्यम स्तरावर असून, त्यात काही सुधारणा झालेली नाही. मंगळवारी (ता. २७) हवा गुणवत्ता निर्देशांक १२० नोंदविण्यात आला आहे.
मंगळवारी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार चकाला येथे हवा गुणवत्ता निर्देशांक १७४ इतका आहे. नेव्ही नगर १५२, मालाड १४४, माझगाव १४३, देवनार १३१, विलेपार्ले, घाटकोपर आणि बोरिवली पूर्वेला हवा गुणवत्ता निर्देशांक १३० एक्यूआय नोंदविण्यात आला आहे.
या भागांव्यतिरिक्त उर्वरित मुंबईत हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मागील मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर असणेही समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करीत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या.
नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहन प्रदूषण, बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि इतर कारणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका कोणत्या ठोस उपाययोजना राबविते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहरातील अनेक भागांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारकक ते घातक श्रेणीत पोहोचला असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
प्रदूषणातील पीएम २.५ आणि पीएम १० कणांचे प्रमाण वाढल्यामुळे दमा, श्वसनाचे अन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास बाहेर जाणे टाळण्याचे, मास्कचा वापर करण्याचे आणि प्रदूषणाची पातळी तपासूनच बाहेरील कामे करण्याचे आवाहन छातीविकार तज्ज्ञ डॉ. रोहित हेगडे यांनी केले आहे.
हवा प्रदूषणाची कारणे
*वाहनांची प्रचंड संख्या ः डिझेलवर चालणारी वाहने पीएम २.५ आणि पीएम १० सारखे घातक कण हवेत सोडतात.
* बांधकाम आणि रस्त्यांची धूळ : सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढते.
* औद्योगिक उत्सर्जन ः काही भागांमध्ये कारखान्यांतून निघणारा धूर हवा अधिक विषारी करतो.
* हवामान आणि आर्द्रता ः मुंबईतील दमट हवामानामुळे प्रदूषक हवेत जास्त काळ अडकून राहतात.
आरोग्यावर होणारे परिणाम
हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. दमा, श्वासनलिकेचा दाह, फुप्फुसांचे संसर्ग,
लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये श्वसनाचा त्रास, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे
वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत चालले आहे. त्यासोबतच श्वसनाचे आजारही वेगाने वाढत आहेत. रुग्णालयामध्ये अस्थमा आणि अप्पर रेस्पीरेटरी समस्या जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय