मध्य-पश्चिम रेल्वेवर ‘फटका गँग’चे ६० अड्डे
लोकल प्रवाशांच्या हातावर घाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजात उभ्या प्रवाशांना लक्ष्य करून मोबाईल व मौल्यवान वस्तू लंपास करणारी ‘फटका गँग’ पुन्हा सक्रिय झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अशा एकूण ६० संवेदनशील ठिकाणांची नोंद असून, रेल्वे पोलिसांनी या गँगविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रेल्वे मार्गालगतची झाडेझुडपे, अंधारी ठिकाणे, पुलांचे खांब आणि वळणावरील परिसर या गँगसाठी सुरक्षित ठरतात. गाडी संथ गतीने असताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल किंवा दागिन्यांवर लाकडी काठी अथवा लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला जातो. धक्क्याने वस्तू खाली पडताच आरोपी ती उचलून पळ काढतात. या घटनांमध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काही प्रकरणांत जीवितहानीही झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झाले असून, संवेदनशील भागांत सुरक्षा जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. काही ठिकाणी ड्रोनद्वारेही रेल्वे मार्गावर लक्ष ठेवले जात आहे.
मध्य रेल्वेवर अशा ३९, तर पश्चिम रेल्वेवर २१ ठिकाणांची नोंद आहे. या भागांत दोन शिफ्टमध्ये पोलिस व आरपीएफचे जवान तैनात आहेत. सातत्याने करण्यात आलेल्या कारवाईमुळे फटका गँगच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असली, तरी गँगकडून नवी ठिकाणे शोधून प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पूर्वी एका वर्षात ८० ते ८५ गुन्हे नोंदवले जात होते. मात्र, गेल्या वर्षी ही संख्या १२ वर आली आहे. तरीही प्रवाशांनी दरवाजात उभे राहून मोबाईल हाताळताना सतर्क रहावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दगडफेकीच्या १,६९८ घटना
जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीत भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर दगडफेकीच्या १,६९८ घटना घडल्या. या प्रकरणांत ६६५ जणांना अटक करण्यात आली. उत्तर रेल्वेमध्ये सर्वाधिक ३६३ प्रकरणांची नोंद झाली. त्यानंतर पूर्व मध्य रेल्वे (२१९), दक्षिण मध्य रेल्वे (१४०), उत्तर मध्य रेल्वे (१२६), पश्चिम रेल्वे (११६) आणि दक्षिण रेल्वे (१०८) यांचा क्रमांक लागतो. मध्य रेल्वेत ९६, तर कोकण रेल्वेत तीन प्रकरणे नोंदली गेली.
दगडफेक गंभीर गुन्हा
रेल्वे गाड्यांवर दगडफेक करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. अशा कृत्यात सहभागी आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाते, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.