प्रशासकीय सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल
सरकारकडून क्रमवारी जाहीर
मुंबई, ता. २७ : प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. राज्य शासनाने राबविलेल्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यापीठाला एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक ८० गुण मिळाले आहेत. राज्य शासनाकडून प्रजासत्ताकदिनी राज्यातील विविध कार्यालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
विकसित महाराष्ट्र २०४७कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनातर्फे प्रशासकीय सुधारणा अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला होता. मुंबई विद्यापीठाने शासनाच्या मूल्यांकनाच्या एकूण नऊ निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, नोंदणी व प्रशिक्षण आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे, अशा सर्व निकषांत मुंबई विद्यापीठाचे मूल्यमापन करून ८० गुण बहाल करण्यात आले. ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये हा १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला होता. या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय विभागांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.